संत गजानन महाराजांचा १५० वा प्रकट दिन... शेगावचा गौरव वाढणार...

Share:
Main Image
Last updated: 28-Jul-2026

शेगाव, (प्रतिनिधी) २८ जुलै - संत गजानन महाराज यांच्या आगामी १५० व्या प्रकट दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने १५० रुपयांचे विशेष स्मृती नाणे आणि टपाल तिकीट जारी करावे, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारकडे केले आहे. श्री संत गजानन महाराजांच्या महान अध्यात्मिक व सामाजिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर योग्य सन्मान मिळावा, यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे.

या संदर्भात जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना अधिकृत पत्रे पाठवून या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:

आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा:

फेब्रुवारी १८७८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रथम प्रकट झालेल्या श्री संत गजानन महाराजांनी मानवाला अध्यात्म, करुणा, नि:स्वार्थ सेवा आणि जनकल्याणाचा संदेश दिला. 'श्री गजानन विजय' या ग्रंथातून त्यांचा हा वारसा लाखो भाविकांपर्यंत पोहोचत असून शेगाव हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र बनले आहे.

संस्थानचे सामाजिक योगदान:

Advertisement

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि मानवतावादी सेवा क्षेत्रात उभे केलेले कार्य अद्वितीय आहे. या कार्यामुळे शेगावची ओळख केवळ अध्यात्मापुरती मर्यादित न राहता सामाजिक सेवेचे केंद्र म्हणून मजबूत झाली आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा उल्लेख:

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी शेगावला भेट देऊन 'राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे' उद्घाटन केले होते. या ऐतिहासिक भेटीने शेगावचे जनसेवेतील महत्त्व अधिक अधोरेखित झाले असल्याचे जाधव यांनी पत्रात नमूद केले.

१७ फेब्रुवारी २०२८ रोजी होणार १५० वा प्रकट दिन

श्री संत गजानन महाराजांचा १५० वा प्रकट दिन सोहळा १७ फेब्रुवारी २०२८ रोजी साजरा केला जाणार आहे. हा सोहळा जगभरातील भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ असणार असून, त्यापूर्वी हे स्मृती नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध झाल्यास ती महाराजांना दिलेली खऱ्या अर्थाने राष्ट्रीय श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

?s=20

Comments

No comments yet.