पंढरपूर, (प्रतिनिधी) २७ जुलै - आषाढी वारी २०२६ दरम्यान राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राबवलेल्या ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल ७ लाख ४७ हजार १७८ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यापक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
पालखी मार्ग तसेच पंढरपूर येथील आरोग्य शिबिरांमध्ये ७ लाख ४२ हजार ७३१ बाह्यरुग्णांवर (OPD) उपचार करण्यात आले, तर ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण (IPD) म्हणून दाखल करून सेवा देण्यात आली. याशिवाय, गंभीर लक्षणे असलेल्या १,६०० रुग्णांना पुढील उच्चस्तरीय उपचारांसाठी संदर्भित (Refer) करण्यात आले.
विविध आजारांवर तातडीने प्रभावी उपचार
वारीच्या कालावधीत साथीचे तसेच असंसर्गजन्य आजारांवर आरोग्य पथकांनी तातडीने उपचार केले:
ताप व श्वसन विकार: तापाचे ४०,९३३ तर तीव्र श्वसन संसर्गाचे (RTI) २३,१०२ रुग्ण.
अतिसार व आमांश: अतिसाराचे १९,४७७ आणि आमांशाचे (डिसेंट्री) ५,४५५ रुग्ण.
दीर्घकालीन आजार: उच्च रक्तदाबाचे (BP) ११,४८६ आणि मधुमेहाचे (Diabetes) ९,९७३ रुग्ण.
आपत्कालीन व इतर प्रकरणांवर मात: ५१ हृदयविकाराचे झटका आलेले रुग्ण, २१४ रस्ते अपघातग्रस्त, ३६५ श्वानदंश (कुत्रा चावणे) आणि १ सर्पदंशाच्या रुग्णावर तात्काळ उपचार करण्यात आले. तपासणीदरम्यान ३ क्षयरोगाचे (TB) रुग्णही आढळून आले.
हायटेक यंत्रणा अन् एअर ॲम्बुलन्सची प्रथमच सुविधा
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी पालखी मार्गावर अभूतपूर्व वैद्यकीय व्यवस्था तैनात करण्यात आली होती:
३५३ रुग्णवाहिका, ६९ सुसज्ज आयसीयू (ICU) आणि १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’.
३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, ३०२ तज्ज्ञ डॉक्टर आणि २१५ आरोग्यदूत सेवेत दाखल.
पहिलीच एअर ॲम्बुलन्स सुविधा: आणीबाणीच्या प्रसंगासाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्स आणि पंढरपुरात २४ तास आयसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
याशिवाय मोफत चष्मा वाटप, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण आणि डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आल्या.
‘आरोग्यसंपन्न वारी’ वेब ॲप हिट!
मुख्यमंत्री सचिवालय, मदत निधी कक्ष आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे तयार केलेल्या ‘आरोग्यसंपन्न वारी’ या वेब ॲपला वारकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. १ लाख ८ हजार ३८ भाविकांनी या ॲपचा थेट लाभ घेतला. एका क्लिकवर रुग्णवाहिका, जवळचे आरोग्य केंद्र, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, मुक्कामाची ठिकाणे आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुलभ व सुरक्षित झाला.