मुंबई, (प्रतिनिधी) २६ जुलै - सोन्याची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात मोठी विशेष मोहीम राबवली आहे. विविध राज्यांत गुप्त माहितीच्या आधारे एकाच आठवड्यात केलेल्या धडक कारवायांमध्ये डीआरआयने २७ किलोपेक्षा जास्त विदेशी बनावटीचे सोने जप्त केले आहे. या तस्करी प्रकरणी १२ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या कारवायांदरम्यान विमानातील टॉयलेट, वाहने, भांडी आणि थेट शरीरात सोने लपवून तस्करी करण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
देशभरातील प्रमुख कारवायांचा आढावा:
विमानाच्या टॉयलेटमध्ये १२ किलो सोने:
अदीस अबाबा येथून आलेल्या विमानात मागच्या टॉयलेटच्या छताच्या पॅनेलमध्ये १२ किलो सोन्याच्या ६ लगडी लपवण्यात आल्या होत्या. विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने बाहेर काढले जाणार होते. या प्रकरणी ३ प्रवाशांना अटक करण्यात आली.
बांगलादेशातून तस्करी; महिला प्रवाशाला पकडले:
उत्तर प्रदेशात 'ब्रह्मपुत्रा मेल'ने प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून ५ किलो वजनाच्या सोन्याच्या ४२ लगडी जप्त करण्यात आल्या. हे सोने तिने कमरेच्या पट्ट्यात व हँडबॅगमध्ये लपवले होते.
मुंबईत सफाई कर्मचाऱ्याचे रॅकेट उघड:
मुंबई विमानतळावर विमानातील टॉयलेटमध्ये मेणाच्या रूपात सोन्याची भुकटी लपवून ती सफाई कर्मचाऱ्यांमार्फत बाहेर काढण्याचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. ३.७ किलो सोने जप्त करून ५ जणांना अटक करण्यात आली.
कोलकाता, कोची अन् गुवाहाटीत जप्ती:
कोलकाता रेल्वे स्थानकावर विशेष भांड्यांमध्ये लपवलेले ४.६ किलो सोने पकडण्यात आले, जे म्यानमारमार्गे आणले होते. याशिवाय कोची येथे शरीरात लपवून आणलेले आणि गुवाहाटीमध्ये कारच्या गुप्त कप्प्यात लपवलेले एकूण २ किलो सोने जप्त करण्यात आले.
सोन्याची तस्करी रोखण्यासाठी कडक पावले
विमानातील कर्मचारी, सफाई कामगार आणि रेल्वे प्रवाशांचा वापर करून चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कवर 'डीआरआय'ने थेट घाला घातला आहे. यापुढील काळातही अशा तस्करांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.