पेट्रोलमध्ये २०% पेक्षा जास्त इथेनॉल मिश्रण करणार? केंद्र सरकारने लोकसभेत दिले हे स्पष्टीकरण...

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २६ जुलै - पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रणाचा (E20) सध्या तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भविष्यात असा निर्णय घ्यायचा झाल्यास तो वैज्ञानिक अभ्यास आणि सर्व तांत्रिक संस्थांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. तसेच E20 पेट्रोल हे सुरक्षित, स्वच्छ आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने उत्कृष्ट इंधन असून यामुळे जुन्या वाहनांचे किंवा इंजिनचे कोणतेही नुकसान होत नाही, असा निर्वाळा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिला.

मूळ उद्दिष्ट ५ वर्षे आधीच साध्य

भारताने योग्य नियोजन, वैज्ञानिक मूल्यमापन आणि टप्प्याटप्प्याने घेतलेल्या निर्णयामुळे २०२५-२६ मध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट वेळेच्या तब्बल ५ वर्षे आधीच पूर्ण केले आहे.

इथेनॉल मिश्रणाचा चढता आलेख:

२०२२-२३: ~१२%

२०२३-२४: ~१४.६%

२०२४-२५: ~१९.२%

२०२५-२६ (नोव्हेंबर-जून): २०%

कोट्यवधी वाहने E20 वर; तक्रारींचे प्रमाण शून्य

सध्या देशात २० कोटींहून अधिक दुचाकी आणि ३ कोटींहून अधिक चारचाकी वाहने या इथेनॉल मिश्रित इंधनावर चालत आहेत.

Advertisement

कंपनीचा अहवाल: देशातील एका मोठ्या कार उत्पादक कंपनीने १.५ कोटी जुन्या (Non-E20) वाहनांसह एकूण २.८४ कोटी वाहनांची सर्व्हिसिंग केली. यात E20 मुळे इंजिन खराब झाल्याची किंवा सुट्या भागांची असामान्य झीज झाल्याची एकही नोंद आढळलेली नाही.

वॉरंटी कायम: वाहन उत्पादक कंपन्या E20 इंधन वापरणाऱ्या वाहनांना नेहमीप्रमाणे वॉरंटी देत आहेत.

मायलेजवरील परिणाम: E10 च्या तुलनेत E20 मुळे मायलेजमध्ये होणारा फरक अवघा ३ ते ५ टक्के एवढाच मर्यादित असून, यामुळे पिकअप आणि वाहनाची कार्यक्षमता सुधारते.

पुन्हा जुन्या पेट्रोलकडे (E0/E10) जाणे शक्य नाही

अत्यंत वैज्ञानिक चाचण्यांनंतरच वाहन उद्योगाने E20 चा स्वीकार केला आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या E0 किंवा E10 पेट्रोलकडे वळण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही.

देशाला आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा

इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमामुळे राष्ट्रीय स्तरावर मोठे आर्थिक व पर्यावरणीय फायदे झाले आहेत:

₹१.९७ लाख कोटी: परकीय गंगाजळीची बचत झाली.

३१६ लाख टन: कच्च्या तेलाच्या वापरात घट झाली.

९५२ लाख टन: कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखले गेले.

₹१.६६ लाख कोटी: थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले.

Comments

No comments yet.