बारामतीत सुरू झाली राज्यातील ही पहिलीच प्रयोगशाळा... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतला अनुभव...

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

बारामती, (प्रतिनिधी) २५ जुलै - बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने (RTO) ‘भारत केअर्स’च्या माध्यमातून उभारण्यात आलेली ‘व्हर्च्युअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ हा नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणारा अत्यंत अभिनव उपक्रम आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

बारामती RTO कार्यालयात उभारण्यात आलेल्या या 'व्हर्च्युअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब'ला दिलेल्या भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अत्याधुनिक व्हीआर (VR) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित वाहनचालन, वाहतूक नियम, अपघातांची कारणे व त्यावर करायचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत दिले जाणारे प्रशिक्षण कसे कार्य करते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वाहनचालक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करण्याच्या या प्रयत्नांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

"हेल्मेट, सीटबेल्टचा वापर हे सामाजिक दायित्व"

Advertisement

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, "नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा नियमित वापर करणे, वेगमर्यादा पाळणे आणि वाहन चालवताना मोबाईल टाळणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. अपघातांत घट करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राज्यातील पहिलीच प्रयोगशाळा बारामतीत सुरू झाली ही अभिमानास्पद बाब आहे."

उपक्रमाचे स्वरूप काय आहे?

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी लॅबबद्दल माहिती देताना सांगितले की, भारत केअर्स संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे युवक, विद्यार्थी, व्यावसायिक ड्रायव्हर्स आणि सर्वसामान्यांना व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून (प्रत्यक्ष अनुभवातून) रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे सोपे जात आहे.

महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

या पाहणीदरम्यान नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, तहसीलदार स्वप्नील रावडे आणि भारत केअर्सचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक राहुल अष्टेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

?s=20

Comments

No comments yet.