पंढरपूर, (प्रतिनिधी) २५ जुलै - राज्यात शेकडो वर्षांपासून संतांनी आपल्या विचारांतून समाजप्रबोधन करतानाच पर्यावरणपूरक जीवनाचा संदेश दिला आहे. हाच विचार गावोगावी पोहोचवण्याचे कार्य ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमातून केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जगासमोरील पर्यावरणाचा मोठा प्रश्न कोणतीही एक व्यक्ती एकटी सोडवू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी खेळली फुगडी आणि पावली
कार्यक्रमात पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे कीर्तन, भारुड आणि पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात टाळ-मृदुंगाच्या गजरात रंगलेल्या पावलीच्या खेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आणि वारकऱ्यांसोबत फुगडी व पावलीचा आनंद लुटला. तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृहात बाल वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे भजन गाऊन स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेल वृक्षाचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रमातील इतर महत्त्वाचे उपक्रम व निर्णय:
कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून जत विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या कार्डियाक रुग्णवाहिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
उड्डाणपुलासाठी जागा हस्तांतरण: सोलापूर शहरातील उड्डाणपुलासाठी ५.६६ हेक्टर जागा सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे व महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे सोपवण्यात आला.
विशेषांकाचे प्रकाशन: ‘तरुण भारत संवाद’ या वृत्तपत्राच्या वारी विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
कीर्तन, भारुड व पोवाड्यांतून १६ वर्षांपासून जनजागृती
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव राहुल रेखावर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मंडळ २०१० पासून हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात संजय महाराज पाचपोर (कीर्तन), संध्याताई साकी (भारुड) आणि शाहीर माळी (पोवाडा) यांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद करत त्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, विजयकुमार देशमुख, गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.