कॅन्सरग्रस्त बालरुग्णांच्या पालकांसाठी मोठी बातमी... १ रूपयाही खर्च न करता होणार निदान... पाहा कसा घ्यायचा लाभ?

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ जुलै - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत राज्यातील कर्करोगग्रस्त (कॅन्सर) बालरुग्णांच्या निदानासाठी (Diagnosis) प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत महागड्या आणि खर्चिक निदान चाचण्यांमुळे उपचारात होणारा विलंब टाळून बालरुग्णांवर वेळेत उपचार सुरू व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि टाटा मेमोरियल सेंटर (TMC) यांच्यात महत्त्वपूर्ण त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील पात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल बालरुग्णांना कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक व पुढील सर्व प्रकारच्या उच्च वैद्यकीय चाचण्यांसाठी थेट आर्थिक मदत दिली जात आहे.

पहिल्या दोन महिन्यांतच ५९ बालरुग्णांना मदत!

५० लाखांचे सहाय्य वितरित: या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, पहिल्या दोन महिन्यांतच ५९ बालरुग्णांना तब्बल ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले आहे.

Advertisement

टाटा रुग्णालयात मोफत चाचण्या: या सर्व ५९ बालरुग्णांच्या कर्करोगाचे अचूक निदान मुंबईतील प्रसिद्ध 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल' येथे करण्यात आले.

लक्ष्य २०० बालरुग्ण: या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण २०० कर्करोगग्रस्त बालरुग्णांना या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे.

मदतीसाठी 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

"आर्थिक अडचणींमुळे निदानाला होणारा उशीर बालरुग्णांच्या जीवावर बेतू शकतो. हा उपक्रम गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. राज्यातील गरजू व पात्र रुग्णांनी अधिक माहिती आणि मदतीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा."

— रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष

Comments

No comments yet.