नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २४ जुलै - NEET परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीविरोधात नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी अत्यंत कठोर आणि दडपशाहीची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या नाशिकच्या २९ वर्षीय इशान देवरे या पीएचडी संशोधकासह सुमारे ५८ विद्यार्थ्यांना पोलिसांनी विनाकारण ताब्यात घेऊन तब्बल २३ तास कोठडीत डांबून ठेवले. पोलिसांकडून लाठीमार, मारहाण आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्यांनी केला आहे.
"एकत्र राहा असं ओरडलो आणि पोलिसांनी उचललं!"
गेली १० वर्षे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या इशान देवरे याने आपबिती सांगताना सांगितले,
"मी सोमवारी सकाळी जंतरमंतरवर पोहोचलो. आंदोलन सुरू असताना पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. मी विद्यार्थ्यांना 'छिन्नभिन्न होऊ नका, एकत्र राहा' असे आवाहन करत होतो. याच कारणावरून पोलिसांनी मला आंदोलनाचा नेता समजून पकडले आणि कृषी भवनाजवळ उभ्या असलेल्या बसमध्ये डांबले."
हॉस्पिटल, स्टेडियम अन् मॉडेल टाऊन पोलीस ठाणे: कसा घडला घटनाक्रम?
लक्ष्य पूर्ण करण्यासाठी धरपकड: आंदोलनात नसलेल्या काही सामान्य नागरिकांनाही केवळ संख्याबळ दाखवण्यासाठी पोलिसांनी बसमध्ये कोंबल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
छत्रसाल स्टेडियमवर डांबले: सुरुवातीला पोलिसांचे वर्तन सामान्य होते. मात्र रात्री १२:३० च्या सुमारास अचानक त्यांची भाषा बदलली. विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आणि त्यांना छत्रसाल स्टेडियमवर नेण्यात आले.
कागदपत्रांवर सह्या आणि मारहाण: जहांगीरपुरी येथील बाबू जगजीवन राम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात रात्रभर ठेवण्यात आले. "दुसऱ्या दिवशी सकाळी काही कागदपत्रांवर सह्या मागितल्या, मी ती कागदपत्रे वाचायचा प्रयत्न केला म्हणून मला थेट पोलिसांकडून कानाखाली मारण्यात आली," असा धक्कादायक आरोप इशान याने केला आहे.
"आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली" — इतर पीडितांचा संताप
उमेश (प्रयागराज): "तो संपूर्ण अनुभव नरकयातनांसारखा होता. आम्हाला जेवण देण्यात आले नाही, फोन काढून घेतले आणि वैयक्तिक पातळीवर बोलावून छळ केला. संसद परिसरात पुन्हा दिसल्यास गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली."
जितेंद्र राणा ठाकूर (शिक्षक, हरियाणा): "केवळ NEET नाही, तर प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटत आहे. या ढासळलेल्या व्यवस्थेविरोधात न्याय मागायला गेल्यावर पोलिसांनी आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली."
लढा सुरूच राहणार!
मंगळवारी (२१ जुलै) दुपारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून बजावल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. नाशिकला सुखरूप परतलेल्या इशान देवरे याने स्पष्ट केले की, "पोलिसांचा लाठीमार, गंभीर दुखापती आणि पोलिसांच्या केसेस होऊनही पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांचा हा लढा थांबणार नाही."