मुंबई, (प्रतिनिधी) २४ जुलै - "राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना झालेला टीईटी (TET) घोटाळा हा ठाकरे सरकारने तात्काळ कारवाई करून उघडकीस आणला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या जीए सॉफ्टवेअर (GA Software) कंपनीला कंत्राट दिले गेले, त्याच कंपनीचा मालक या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निघाला," असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ठाकरेंच्या काळातच सर्वात मोठा टीईटी घोटाळा झाला' असा आरोप केल्यानंतर, अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांची हवा काढून घेतली व त्यांना थेट खुले आव्हान दिले.
फडणवीस काळातच कंत्राट; धागेदारे थेट भाजप-शिंदे गटापर्यंत?
पत्रकार परिषदेत माहिती देताना सुषमा अंधारे यांनी टीईटी आणि म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रमच मांडला:
पहिली अटक आणि कंत्राटदार: डिसेंबर २०२१ मध्ये म्हाडाचा पेपर लीक होणार असल्याची टीप मिळताच ठाकरे सरकारच्या पोलिसांनी तात्काळ छापे टाकून प्रीतिश देशमुख याला अटक केली. हा प्रीतिश देशमुख 'जीए सॉफ्टवेअर' कंपनीचा मालक असून, त्याला २०१४ ते २०१९ या काळात तात्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच सर्व परीक्षांचे कंत्राट दिले होते.
चौकशीची साखळी: प्रीतिश देशमुखच्या चौकशीतून अभिषेक सावरीकर, १४ एजंट्स आणि शिक्षण अधिकारी तुकाराम सुपे यांचे नाव समोर आले. त्यानंतर तुकाराम सुपेने तात्कालीन शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर याचे नाव उघड केले.
आरोपींना राजकीय राजाश्रय: ठाकरे सरकारने या सर्वांना तुरुंगात डांबले होते. मात्र, आरोपी अभिषेक सावरीकर तुरुंगातून बाहेर आल्यावर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी त्याला पक्षात प्रवेश दिला, तर मुख्य आरोपींपैकी एक असलेले सुशील खोडवेकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात रुजू झाले, असा गंभीर आरोप अंधारे यांनी केला.
"ठाकरेंनी स्वतःच्या मंत्र्याच्या मुलीलाही सोडले नाही!"
ठाकरे सरकारच्या पारदर्शक कारभाराचा दाखला देताना अंधारे म्हणाल्या, "या घोटाळ्यात स्वतःच्याच सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी दोषी आढळल्यानंतर ठाकरे सरकारने तिला तात्काळ ब्लॅकलिस्ट (Blacklisted) केले. ठाकरेंनी या तपासात कोणाचाही मुलाहिजा बाळगला नाही."
तपास अधिकारी भाग्यश्री नवटाकेंची उचलबांगडी?
ठाकरे सरकारने ज्या प्रामाणिक तपास अधिकाऱ्यांना या घोटाळ्याचा छडा लावण्यासाठी 'फ्री हँड' दिला होता, त्या पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची देवेंद्र फडणवीस यांनी साईड पोस्टिंग करून गोंदियाला बदली केली, असा आरोपही अंधारे यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांना खुले आव्हान!
"देवेंद्रजी, मी आज मांडलेल्या पुराव्यांवर आणि तथ्यांवर तुमचे काही स्पष्टीकरण असेल तर जरूर द्या. तुम्ही उत्तर दिले नाही, तर उद्या पुन्हा पुराव्यांसह तुमचा खोटारडेपणा संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड करेन!"
— सुषमा अंधारे, उपनेत्या व प्रवक्त्या (शिवसेना - उबाठा)