मुंबई, (प्रतिनिधी) २४ जुलै - विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित, सुलभ आणि देशभरात सहज उपलब्ध व्हावीत, तसेच उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेयांक (Academic Credits), पदवी व पदविका प्रमाणपत्रे तातडीने ‘अपार आयडी’ (APAAR ID) आणि ‘डिजी लॉकर’ (DigiLocker) वर अपलोड करावीत, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक विद्यार्थी ओळखपत्र’ (One Nation, One Student ID) या धोरणांतर्गत 'अपार आयडी' आणि 'डिजी लॉकर' उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अपार आयडी निर्मितीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर!
या आढावा बैठकीत महाराष्ट्राने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात आली:
२ कोटी ६७ लाख अपार आयडी: राज्यात आतापर्यंत तब्बल २ कोटी ६७ लाख विद्यार्थ्यांचे अपार आयडी यशस्वीरीत्या तयार करण्यात आले असून, या कामगिरीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३९.६७ लाख क्रेडिट ट्रान्सफर: विद्यार्थ्यांचे सुमारे ३९ लाख ६७ हजार अकॅडमिक क्रेडिट्स यशस्वीरीत्या हस्तांतरित करण्यात आले आहेत.
३१ जुलैपर्यंत डेटा अपलोड करण्याची मुदत
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जून २०२६ पर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचे निकाल आणि संबंधित विद्यार्थ्यांचे श्रेयांक ३१ जुलै २०२६ पर्यंत अपार आयडीशी संलग्न करून पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, "विद्यापीठांनी आता पदवीदान (Convocation) समारंभाची वाट न पाहता" परीक्षांचे निकाल लागताच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी पदवी व पदविका प्रमाणपत्रांच्या 'सॉफ्ट कॉपी' तातडीने डिजी लॉकरवर उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड्स डिजीटल स्वरूपात सुरक्षित राहतील आणि देशभरात कुठेही नोकरी किंवा पुढील प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यंत सोपे होणार आहे. यासंदर्भात उच्च शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांना परिपत्रक जारी केले आहे.