पणजी, (प्रतिनिधी) २३ जुलै - 'आत्मनिर्भर भारत' अभियानांतर्गत देशाच्या स्वदेशी नौदल सामर्थ्यात आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. 'माहे' श्रेणीतील उथळ पाण्यात वापरण्यासाठी (ASW-SWC) अत्यंत अद्ययावत असणारी दुसरी स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका 'आयएनएस मालवण' (INS Malwan) बुधवारी कर्नाटकातील कारवार येथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली.
हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक मजबूत झाली आहे.
८० टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. 'आयएनएस मालवण'चा ८० टक्क्यांहून अधिक भाग पूर्णपणे स्वदेशी साहित्याने आणि तंत्रज्ञानाने बनवला गेला आहे.
सागरी व्यापाराची सुरक्षा आणि सागरी दळणवळण मार्ग सुरक्षित ठेवणे देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच भविष्यातील सुरक्षेची आव्हाने पेलण्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यदलांमध्ये परस्पर समन्वय असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
‘वाघ नखे’ आणि "सायलेंट क्लॉज": वैशिष्ट्यपूर्ण बोधचिन्ह
ऐतिहासिक वारसा: नवी 'आयएनएस मालवण' ही २००३ मध्ये निवृत्त झालेल्या जुन्या किनारपट्टी सुरुंगविरोधी (Inshore Minesweeper) नौकेचा वारसा पुढे चालवणार आहे.
वाघ नखे: या युद्धनौकेच्या बोधचिन्हावर शौर्य, चपळता आणि व्यूहरचनात्मक युद्धकौशल्याचे प्रतीक म्हणून 'वाघ नखे' कोरण्यात आली आहेत.
ब्रीदवाक्य: "सायलेंट क्लॉज" (Silent Claws) हे या जहाजाचे ब्रीदवाक्य असून ते गुप्तता, अचूकता आणि वेगाने थेट प्रहार करण्याची अफाट क्षमता दर्शवते.
नेव्हीच्या 'कार्यान्वयन सज्जतेला' मोठी धार
'आयएनएस मालवण'ची निर्मिती कोची येथील 'कोचीन शिपयार्ड लिमिटेड'ने केली आहे. उथळ पाण्यात तसेच किनारपट्टीच्या भागात गुप्तपणे वावरणाऱ्या शत्रूच्या पाणबुड्यांचा वेध घेऊन त्यांना नष्ट करण्याचे काम ही युद्धनौका करेल. मोठ्या युद्धनौका, पाणबुड्या आणि हवाई यंत्रणेसोबत समन्वय साधून काम करण्याची उत्तम क्षमता यात आहे.
या सोहळ्यास वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल संजय वत्सायन, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोचीन शिपयार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.