ग्राहकांच्या प्रश्नांवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक... मंत्रालयात पार पडली उच्चस्तरीय बैठक...

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ जुलै - अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सादर केलेल्या विविध प्रलंबित मागण्या आणि ग्राहकांच्या समस्यांवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील ग्राहक आयोगांमधील प्रलंबित प्रकरणे, अपुऱ्या पायाभूत सुविधा, स्मार्ट मीटरची सक्ती आणि औषध विक्रीतील मनमानी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन मंत्री भुजबळ यांनी संबंधित विभागांना ठोस निर्देश दिले.

प्रलंबित प्रकरणांच्या निपटारासाठी ऑनलाईन सुनावणीवर भर

राज्यातील विविध ग्राहक आयोगांमध्ये कायद्यानुसार ९० दिवसांत केसेस निकाली निघणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आयोगांमध्ये 'ई-दाखील' प्रणाली आणि ऑनलाईन सुनावणी प्रभावीपणे लागू करण्याच्या अनुषंगाने तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले. तसेच ऑनलाईन सुनावणीद्वारे ही प्रलंबित प्रकरणे अन्य आयोगांकडे वर्ग करण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयोगातील रिक्त पदे अन् पायाभूत सुविधा

ग्राहक आयोगातील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारकडून नियमांत दुरुस्ती सुरू असून सध्या यावर स्थगिती आहे. यासंदर्भात आपल्या स्तरावरून केंद्र सरकारला त्वरित विनंती केली जाईल, असे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले. तसेच आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांची टंचाई दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीचा पर्याय तपासण्याचे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले.

Advertisement

बैठकीत घेतलेले अन्य महत्त्वाचे निर्णय व निर्देश:

मंत्रालयाकडून विविध विभागांना सूचना: स्मार्ट मीटरची सक्ती, महानगर गॅसची चुकीची बिलिंग, खराब रस्त्यांवर टोल वसुली, आरटीओमध्ये स्मार्ट कार्ड मिळण्यास होणारा उशीर आणि हॉस्पिटल्सकडून अंतर्गत फार्मसीमधूनच औषधे घेण्याची केली जाणारी सक्ती यावर आळा घालण्यासाठी संबंधित विभागांना अवगत केले जाईल.

ग्राहक संरक्षण परिषद: राज्य ग्राहक संरक्षण परिषद गठित करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून जिल्हा स्तरावर नियमित बैठका घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.

ग्राहक दिन सार्वजनिक ठिकाणी साजरा होणार: २४ डिसेंबर (राष्ट्रीय ग्राहक दिन) आणि १५ मार्च (आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन) हे केवळ शासकीय इमारतींपुरते मर्यादित न ठेवता सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्याचे निर्देश पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यांना पत्राद्वारे दिले जातील.

बैठकीला प्रमुख उपस्थिती:

या बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर, सूर्यकांत पाठक, वीणा दीक्षित, धनंजय गायकवाड यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालयाचे कार्यकारी अधिकारी प्रथमेश घोलप, समन्वयक निलेश आलाटे, अवर सचिव दिपाली जपे आणि कक्ष अधिकारी ईशा पवार उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.