मुंबई, (प्रतिनिधी) २२ जुलै - भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणी न केल्यास काही प्रकरणांमध्ये मतदार यादीतील नावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी २९ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. नागरिकांना ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत 'ECINet' या ॲपवरून मोबाईलद्वारे ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्टेप बाय स्टेप : 'SIR' ऑनलाइन फॉर्म भरण्याची सोपी पद्धत
१. ॲप डाऊनलोड व नोंदणी:
सर्वप्रथम Google Play Store वरून निवडणूक आयोगाचे अधिकृत 'ECINet' ॲप डाऊनलोड करून ओपन करा. ॲप उघडल्यानंतर मोबाईल नंबर आणि OTP च्या साह्याने नवीन खाते उघडा किंवा जुने खाते लॉगिन करा.
२. २००२ च्या SIR यादीत नाव शोधा:
ॲपमधील 'Search Your Name in Last SIR' या पर्यायावर जाऊन तुमचे राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडा. तुमचे स्वतःचे किंवा आई, वडील, आजी, आजोबा यांचे नाव शोधून त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
३. EPIC नंबर आणि माहितीची तपासणी:
ॲपच्या होम स्क्रीनवरील 'Voter Registration Forms' मध्ये जाऊन 'Special Intensive Revision' हा पर्याय निवडा. त्यानंतर राज्य आणि तुमचा EPIC (मतदान कार्ड) नंबर टाकून माहिती तपासा.
४. महत्त्वाच्या दोन अटी:
नावाचे स्पेलिंग: आधार कार्ड आणि मतदान कार्डावरील इंग्रजी नाव अक्षरशः एकसारखे (Spelling Match) असणे आवश्यक आहे. नाव जुळत नसल्यास ऑनलाइन अर्ज भरता येणार नाही; अशा वेळी BLO (बीएलओ) कडे जाऊन ऑफलाइन प्रक्रिया करावी लागेल.
मोबाईल नंबर लिंक: मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक असावा. लिंक नसल्यास ॲपमधील 'Correction of Entries' पर्यायावर जाऊन काही मिनिटांत नंबर अपडेट करा.
५. अर्जातील योग्य पर्यायाची निवड:
माहिती पडताळणीनंतर तुम्हाला ४ पर्याय दिसतील:
पर्याय १: २००२ च्या यादीत स्वतःचे नाव असल्यास.
पर्याय २: स्वतःचे नाव नसून आई-वडील किंवा आजी-आजोबांचे नाव असल्यास.
पर्याय ३: कुटुंबातील कोणाचेही नाव सध्याच्या मतदार यादीत असल्यास.
पर्याय ४: वरीलपैकी कोणताही पर्याय लागू होत नसल्यास.
६. वैयक्तिक माहिती, फोटो अन् e-Sign:
योग्य पर्याय निवडून वैयक्तिक माहिती, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव, EPIC नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो (JPG फॉरमॅट) अपलोड करा. संपूर्ण फॉर्म तपासून Aadhaar e-Sign आणि OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करून फॉर्म सबमिट करा.
रेफरन्स आयडी सांभाळून ठेवा
फॉर्म सबमिट झाल्यावर मिळणाऱ्या Reference ID चा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तो तुमच्या क्षेत्रातील BLO कडे पाठवा. तांत्रिक अडचण किंवा OTP न आल्यास वेळ न घालवता थेट BLO कडे जाऊन ऑफलाइन फॉर्म भरण्याचे आवाहन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.