पुढील ४ दिवसात हे काम पूर्ण हवेच... नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी भरला सज्जड दम...

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २१ जुलै - भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाच्या सुधारित वेळापत्रकानुसार गणना अर्जांचे वितरण, संकलन, डिजिटायझेशन, फोटो सिमिलर एन्ट्रीज (PSE) पडताळणी आणि मतदार यादी शुद्धीकरणाची सर्व कामे पुढील चार दिवसांत मिशन मोडमध्ये १००% पूर्ण करावीत, असे कडक निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) आणि बीएलओ पर्यवेक्षकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पावसाच्या व्यत्ययामुळे आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून प्रत्येक अधिकाऱ्याने अचूकता, गती आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.

बैठकीतील महत्त्वाचे निर्देश आणि निर्णय:

कामाची वेळ व दैनंदिन उद्दिष्ट:

मतदार घरी उपलब्ध राहण्याच्या वेळेनुसार सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या वेळेत बीएलओंनी (BLO) प्रत्यक्ष गृहभेटी द्याव्यात. प्रत्येक बीएलओने दररोज किमान २०० गणना अर्जांचे डिजिटायझेशन करणे अनिवार्य आहे.

तीन शिफ्टमध्ये डिजिटायझेशन केंद्रे:

कामाचा वेग वाढवण्यासाठी शाळा, महाविद्यालये किंवा सायबर कॅफे अधिग्रहित करून तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करून डिजिटायझेशनचे काम मुदतीत पूर्ण केले जाईल.

डुप्लिकेट आणि बोगस नाव नोंदणीवर कडक नजर (PSE Verification):

Photo Similar Entries (PSE) आणि राजकीय पक्षांच्या तक्रारींनुसार संशयित व डुप्लिकेट मतदारांची काटेकोर पडताळणी केली जाईल. मयत (Death), स्थलांतरित (Shifted) किंवा गैरहजर (Absent) मतदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करून महानगरपालिकेकडून मृत्यू दाखले घेऊन नावे वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.

आधार व फोटोंबाबत महत्त्वाची स्पष्टोक्ती:

गणना अर्जासोबत मतदारांच्या आधार कार्डाच्या प्रती जमा करू नयेत, केवळ आधार क्रमांकाची अचूक नोंद करावी. तसेच बीएलओ ॲपमध्ये थेट फोटो घेण्याची सोय असल्याने मतदारांकडून स्वतंत्र फोटो मागू नयेत.

Advertisement

हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा:

फिल्डवर गैरहजर राहणाऱ्या बीएलओ आणि बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. राजकीय पक्षांच्या कार्यालयात बसून अर्ज वाटप करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

NSS, NCC आणि मनपा कर्मचाऱ्यांची मदत:

गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या आणि कठीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एनएसएस (NSS), एनसीसी (NCC) विद्यार्थी, मनपाचे मालमत्ता कर कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) सुधारित वेळापत्रक:

गृहभेटींचा वाढीव कालावधी: ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: १७ ऑगस्ट २०२६

दावे व हरकती स्वीकारणे: १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६

दावे व हरकतींवर सुनावणी: १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत

अंतिम मतदार यादी प्रसिद्धी: १९ ऑक्टोबर २०२६

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.