दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २० जुलै - कार खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका भामट्याने अटी व शर्तींचे उल्लंघन करून एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.
संशयिताने कार ताब्यात घेऊनही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड न केल्यामुळे पीडित महिलेला मोठा मानसिक व आर्थिक मनस्ताप सहन करावा लागला. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी रवी शिंदे (रा. भराडवाडी, पेठ रोड, नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या संदर्भात जयश्री तांदळे (रा. इंद्रप्रस्थनगर, पेठ रोड, नाशिक) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
असा झाला होता व्यवहार:
फिर्यादी जयश्री तांदळे यांनी 'बँक ऑफ बडोदा'कडून कर्ज घेऊन एक स्विफ्ट कार (क्र. एमएच १५ एमएच ४९५५) खरेदी केली होती. या कारसाठी त्या दरमहा ९ हजार ९०० रुपयांचा बँकेचा हप्ता भरत होत्या. मात्र, सन २०२३ मध्ये काही वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे त्यांनी ही कार विकण्याचा निर्णय घेतला.
या दरम्यान संशयित विकी शिंदे याने तांदळे यांची भेट घेऊन कार खरेदी करण्याची तयारी दर्शविली. ३१ मे २०२३ रोजी त्यांच्यात रीतसर करारनामा झाला. या व्यवहारात संशयिताने तांदळे यांना ५० हजार रुपयांची टोकन रक्कम दिली आणि कार आपल्या स्वाधीन करून घेतली.
करारनाम्यातील अटी व शर्तींनुसार, कारवरील बँकेचे उर्वरित सुमारे ५ लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज फेडण्याची संपूर्ण जबाबदारी संशयित विकी शिंदे याने घेतली होती.
बँकेचे हप्ते थकवले, 'सिबिल स्कोर' खालावला!
कार ताब्यात घेतल्यानंतर संशयित शिंदे याने बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड केली नाही आणि करारनाम्यातील नियमांचे उघड उल्लंघन केले.
बँकेचे हप्ते थकल्यामुळे बँक प्रशासनाने मूळ कर्जदार असलेल्या जयश्री तांदळे यांच्याकडे तगादा लावला. यामुळे तांदळे यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. इतकेच नव्हे तर, हप्ते थकल्यामुळे त्यांचा बँकेचा 'सिबिल स्कोर' (CIBIL Score) देखील पूर्णपणे खराब झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयश्री तांदळे यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित विकी शिंदे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.