स्कूल बसचालकाचे अश्लील हावभाव... अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून घरात घुसखोरी...

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २० जुलै - नाशिक शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रविवारी (दि. १९) वेगवेगळ्या भागात विनयभंगाच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. 

भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा स्कूल बसचालकाने विनयभंग केला, तर दुसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा छळ करून घरात घुसून विनयभंग करण्यात आला.

 याप्रकरणी नाशिकरोड आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो - POCSO) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ओळखीचा गैरफायदा घेत स्कूल बसचालकाचे अश्लील हावभाव

पहिली घटना नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात घडली. येथील एक महिला रविवारी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी भगवती लॉन्स परिसरात गेली होती. यावेळी प्रवीण दगा शेजवळ या स्कूल बसचालकाने त्या महिलेचा विनयभंग केला.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रवीण हा चार वर्षांपूर्वी पीडित महिलेच्या मुलांना शाळेत नेण्या-आणण्याचे काम करत होता. ओळखीचा असल्यामुळे पीडितेने सुरुवातीला त्याच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केले. मात्र, संशयिताची मजल थेट भररस्त्यात अश्लील हावभाव आणि शेरेबाजी करण्यापर्यंत गेल्यामुळे पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. 

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक नागलोत पुढील तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून घरात घुसखोरी

दुसरी खळबळजनक घटना द्वारका भागातील शंकरनगर येथे घडली. एका अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, रेहान शेख नावाचा संशयित तरुण गेल्या महिनाभरापासून तिचा सातत्याने पाठलाग करून मानसिक त्रास देत होता.

शनिवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास संशयित रेहान याने अल्पवयीन मुलीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्याने मुलीला गाठून "तू माझ्याशी मैत्री कर," असा तगादा लावत तिचा विनयभंग केला. या घाबरवून टाकणाऱ्या प्रसंगानंतर पीडित मुलीने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठले.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग आणि 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सदावर्ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.