स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त... नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २२ ते २८ जुलैदरम्यान ‘जनसेवा सप्ताह’

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २० जुलै - महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हाभर ‘जनसेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात समाजोपयोगी, लोकहितकारी आणि जनकल्याणाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांनी दिली.

दरवर्षी २२ जुलै हा दिवस स्व. अजितदादा पवार यांचा वाढदिवस म्हणून उत्साहात साजरा केला जात असे. मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस केवळ स्मरणाचा न राहता समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे यंदा वाढदिवस साजरा करण्याऐवजी संपूर्ण आठवडा ‘जनसेवा सप्ताह’ म्हणून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनानुसार स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील विविध सेल आणि तालुका संघटनांच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

या अंतर्गत विद्यार्थी काँग्रेसतर्फे २२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण, युवती काँग्रेसतर्फे २५ जुलै रोजी राष्ट्रवादी भवन येथे कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा, २६ जुलै महिला काँग्रेसतर्फे रोजी भगूर येथे रक्तदान शिबिर, युवक काँग्रेसतर्फे रामशेज किल्ला स्वच्छता मोहीम तथा प्रत्येक तालुक्यात विविध लोकापयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर सामाजिक न्याय विभागामार्फत त्रिमूर्ती चौक येथे सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय तालुका स्तरावर २२ जुलै रोजी येवला येथे महाराजस्व समाधान शिबीर व मुक्तीभूमी स्वच्छता मोहीम, वणी येथे शेतकरी मेळावा व महिला बचत गट मेळावा, पिंपळगाव येथे हमाल, मापारी आणि व्यापाऱ्यांसोबत अजित दादांची जयंती साजरी करण्यात येणार आहे, सुरगाणा येथे महाराजस्व समाधान शिबीर, देवळा येथे वृक्षारोपण आणि आश्रमशाळेत शालेय साहित्य वाटप, मालेगाव येथे शासकीय रुग्णालयात फळवाटप, बागलाण येथे वृक्ष दिंडी, वृक्षारोपण, सेल्फी विथ गडकिल्ले, पेठ येथे २२ ते २६ जुलै दरम्यान वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम, नांदगाव येथे वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम व आरोग्य शिबीर, २७ जुलै रोजी कांदा उत्पादक शेतकरी मार्गदर्शन शिबीर आणि कळवण येथे वृक्ष दिंडी, रक्तदान शिबीर व महापुरुषांचे पुतळे स्वच्छता मोहीम  तसेच विविध समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या जनसेवा सप्ताहात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, महिला, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना कृतीतून अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांनी केले आहे.

"समाजसेवा हीच स्व. अजितदादा पवार यांना खरी आदरांजली आहे," असे नमूद करत त्यांच्या लोककल्याणाच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने समाजाशी नाळ जोडून सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही खैरे यांनी सांगितले.

Advertisement

Comments

No comments yet.