केबिनमध्येच आढळला पोलीस महासंचालकांचा मृतदेह... संशयास्पद मृत्यूमुळे पोलीस दलात मोठी खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २० जुलै - त्रिपुरा पोलीस दलाचे महासंचालक (DGP) आणि १९९४ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनुराग धनखड (वय ५०-५५ च्या दरम्यान) यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयातील त्यांच्याच कार्यालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली. आपल्याच केबिनमध्ये ते मृतावस्थेत आढळून आल्याने देशभरातील पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असून, पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या अनुराग धनखड यांनी २०२५ मध्ये त्रिपुराच्या डीजीपी पदाची सूत्रे हाती घेतली होती.

डॉक्टरांचे ४८ मिनिटे शर्थीचे प्रयत्न, पण...

अगरतळा येथील गोविंद वल्लभ पंत (जीबी पंत) रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर प्रदीप भौमिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारास डीजीपी धनखड यांना अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयात आणताच त्यांची नाडी आणि रक्तदाब (बीपी) तपासण्यात आला, मात्र त्यांच्या शरीरात जिवंत असल्याचे कोणतेही संकेत मिळत नव्हते.

त्यांना तातडीने आपत्कालीन कक्षात (Emergency Unit) हलवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तब्बल ४८ मिनिटे सातत्याने 'सीपीआर' (CPR) देऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Advertisement

घटनास्थळ सील; वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव

डीजीपींच्या आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यूची माहिती मिळताच त्रिपुरा पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस मुख्यालयात आणि रुग्णालयात धाव घेतली. ज्या केबिनमध्ये हा प्रकार घडला, ते कार्यालयीन घटनास्थळ पोलिसांनी तातडीने सील केले आहे. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तेथील पुरावे गोळा केले जात आहेत.

अनुराग धनखड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आणि त्रिपुरा सरकारने या संवेदनशील घटनेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा पत्रक जारी केलेले नाही.

शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष

डीजीपींच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा अचूक उलगडा शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल आल्यानंतरच होऊ शकेल, असे तपास यंत्रणांनी सांगितले. एका राज्याच्या पोलीस प्रमुखाचा मुख्यालायातच अशा रीतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.