मुंबई, (प्रतिनिधी) २० जुलै - देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीतील घसरणीचा कल चालू आठवड्यातही कायम राहिला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी (२० जुलै) देशातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी खाली आले आहेत. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४३,४३० रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि जागतिक घडामोडींमुळे सोन्याचे भाव घसरल्याने, सोने खरेदीच्या तयारीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठी दिलासा मिळाला आहे.
केवळ देशांतर्गत बाजारातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंच्या किमतीत नरमाई दिसून आली. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर घसरून प्रति औंस ४,०००.५५ डॉलरवर आला आहे. तर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या अमेरिकन गोल्ड फ्युचर्सची किंमतही प्रति औंस ४,००५.९ डॉलर इतकी नोंदवली गेली.
प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):
शहर २४ कॅरेट सोन्याचा दर २२ कॅरेट सोन्याचा दर
दिल्ली १,४३,४३० रुपये १,३१,४४० रुपये
मुंबई १,४३,२८० रुपये १,३१,३४० रुपये
पुणे १,४३,२८० रुपये १,३१,३४० रुपये
कोलकाता १,४३,२८० रुपये १,३१,३४० रुपये
चेन्नई १,४३,२८० रुपये १,३१,३४० रुपये
बंगळुरू१,४३,२८० रुपये१,३१,३४० रुपये
चांदीचीही चकाकी घटली; प्रति किलो २.३० लाखांच्या आत
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी बाजारात चांदीचा दर प्रति किलो २,२९,९०० रुपये इतका नोंदवला गेला. काही महिन्यांपूर्वी चांदीच्या भावाने नवा उच्चांक गाठला होता, मात्र आता त्यात सातत्याने कपात होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस ५६.४२ डॉलरवर स्थिरावला आहे.
मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचा भडका; महागाईची चिंता वाढली
एकीकडे सोने-चांदी स्वस्त होत असताना, दुसरीकडे भूराजकीय घडामोडींमुळे इंधनाचा भडका उडाला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे 'ब्रेंट' कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल ९० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. अमेरिकेने इराणवर सलग नवव्या रात्री हल्ले केल्याचे वृत्त असून, जॉर्डनवरील इराणी हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, अमेरिकेची मध्यवर्ती बँक ‘फेडरल रिझर्व्ह’ व्याजदरात वाढ करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेने व्याजदर वाढवल्यास गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक काढून इतर पर्यायांकडे वळू शकतात, ज्यामुळे येत्या काळात सोने-चांदीवर आणखी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे:
कच्चे तेल: ९० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्याने जागतिक बाजारपेठेत चिंतेचे ढग.
चांदीचा भाव: देशांतर्गत बाजारात २,२९,९०० रुपये प्रति किलोवर घसरण.
गुंतवणूकदारांची नजर: अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी भूमिकेकडे बाजारपेठेचे लक्ष.