E20 पेट्रोल की घाणेरडे पाणी... व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप...

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २० जुलै - देशभरात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा (E20) वापर वाढवण्यावर भर दिला जात असतानाच, आता याचे गंभीर दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. E20 पेट्रोलमुळे केवळ वाहनधारकच त्रस्त नसून, पेट्रोल पंपांचे मालकही प्रचंड अडचणीत सापडले आहेत. पावसाळा आणि किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेमुळे पेट्रोल पंपांच्या साठवणूक टाक्यांमध्ये आपोआप भेसळ होत असून, वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी पाणी जात असल्याच्या धक्कादायक तक्रारी वाढल्या आहेत. या गंभीर समस्येवर इंधन कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना जाहीरपणे काहीही न बोलण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कारवाईच्या भीतीने पंप चालक नाव न सांगण्याच्या अटीवर आपली चिंता व्यक्त करत आहेत.

नेमकी अडचण काय? तज्ज्ञांनी उलगडले गणित

या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांच्या मते, इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याचे वैशिष्ट्य (Hygroscopic Nature) असते. पेट्रोल पंपांच्या जमिनीखालील टाक्यांची रचना ही मूळ पेट्रोलच्या हिशोबाने केलेली आहे, इथेनॉल मिश्रित इंधनासाठी नाही.

पावसाचे दिवस, वाढलेली आर्द्रता किंवा टँकरमधून इंधन उतरवताना त्यात मिसळणारे पाणी यामुळे जमिनीखालील टाक्यांमध्ये पाणी पोहोचते. टाक्यांमधील एकूण E20 साठ्यात पाण्याचे प्रमाण ०.५ टक्क्यांहून अधिक झाले की, तिथे 'फेज सेपरेशन' (Phase Separation) ही प्रक्रिया घडते. यामध्ये इथेनॉल पेट्रोलपासून वेगळे होऊन पाण्यासोबत मिसळते आणि हे जड मिश्रण टाकीच्या तळाशी जाऊन बसते, तर शुद्ध पेट्रोल वर तरंगते.

...म्हणून वाहनात जातेय पाणी!

पेट्रोल पंपावरील 'फ्युल डिस्पेन्सर' (इंधन पुरवणारे यंत्र) जमिनीखालील टाकीच्या अगदी तळापासून इंधन वर खेचते. तळाशी पाणी आणि इथेनॉलचे मिश्रण साचलेले असल्याने, पेट्रोलऐवजी हे घाणेरडे पाणी थेट ग्राहकांच्या वाहनांमध्ये जाते.

ग्राहकांचा संताप, व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल

Advertisement

पेट्रोल पंपावरून वाहनात इंधन भरल्यानंतर काही अंतरावरच वाहने बंद पडत आहेत, इंजिन निकामी होत आहेत, तर काहींचा मायलेज कमालीचा घटला आहे. फ्युल डिस्पेन्सरमधून पेट्रोलऐवजी घाणेरडे पाणी येत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे ग्राहक पंपांवर येऊन वाद घालत असून, पंप चालकांना नाहक ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

टँक आणि पाईपलाईन गंजण्याचा धोका

किनारपट्टीच्या भागातील जमिनीखाली पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथील पेट्रोल पंपांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. याशिवाय, पेट्रोल पंपांच्या जमिनीखालील टाक्या आणि पाईपलाईन या 'माईल्ड स्टील' (Mild Steel) पासून बनवलेल्या असतात. इथेनॉलमधील पाण्याच्या अंशामुळे आता या महागड्या टाक्यांना गंज लागण्याची आणि संपूर्ण इंधन साठा खराब होण्याची भीती पंप मालकांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात :

'फेज सेपरेशन': पाण्यात ०.५% पेक्षा जास्त ओलावा झाल्यास इथेनॉल पेट्रोल सोडून पाण्याशी हातमिळवणी करते आणि तळाशी बसते.

इंजिनवर विपरीत परिणाम: वाहनांचे मायलेज घटण्यासह इंजिन वारंवार नादुरुस्त होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ.

कंपन्यांचा दबाव: समस्येवर जाहीर वाच्यता न करण्यासाठी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल पंप चालकांवर दबाव.

Advertisement

Comments

No comments yet.