दिल्लीत जंतर मंतरवर आज काय होणार? देशभरातून 'जेन झी' लोंढे राजधानीत... संसदेवर महामोर्चा धडकणार?

Share:
Main Image
Last updated: 20-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २० जुलै - 'नीट' (NEET) सह केंद्रीय परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे संतप्त झालेले देशभरातील 'जेन झी' (Gen Z) तरुण आज (सोमवारी) संसदेवर धडकणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) या संघटनेच्या नेतृत्वाखालील आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीतील काही भागांत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जंतरमंतर, सफदरजंग रुग्णालय आणि संपूर्ण संसद मार्ग परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने आंदोलनाला धार

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यामुळे तरुणांमधील संताप अधिकच वाढला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो तरुण-तरुणी दिल्लीच्या दिशेने दाखल झाले असून जंतरमंतरवर गर्दी वाढत आहे.

पेपरफुटी प्रकरणी सरकारने जबाबदारी निश्चित करावी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि शिक्षण व्यवस्थेत तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मोर्चेकरांची प्रमुख मागणी आहे. सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी सर्व देशवासीयांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो याही या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

'स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन यशस्वी करा!'

रुग्णालयात उपचार घेत असलेले सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातूनच देशवासीयांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. "संसदेवर निघणारा आजचा मोर्चा हे स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन असून ते यशस्वी करा. आपल्याला भयमुक्त भारत आणि अन्यायमुक्त भारत हवा आहे. पेपरफुटीसारख्या अन्यायापासून आणि बेकायदा अटकेच्या भीतीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे आहे," असे आवाहन वांगचुक यांनी केले आहे.

वांगचुक यांना अन्य रुग्णालयात हलवण्यास हायकोर्टाचा नकार

दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केलेल्या सोनम वांगचुक यांना तत्काळ मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश द्यावेत, ही गीतांजली आंगमो यांची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. वांगचुक यांना त्यांच्या मर्जीशिवाय रुग्णालयात ठेवण्यात आले असून पोलिसांचे हे कृत्य बेकायदा असल्याचा दावा गीतांजली यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने तो अमान्य करत, "वांगचुक यांची प्रकृती पाहूनच सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, त्यामुळे हे बेकायदा कृत्य म्हणता येणार नाही," असे नमूद केले.

Advertisement

...तर वांगचुक उपोषण सोडण्यास तयार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि उत्तरदायित्वाचा मुद्दा उचलण्याचे आश्वासन दिल्यास सोनम वांगचुक हे आपले उपोषण सोडायला तयार आहेत, अशी माहिती त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दिली. लोकप्रतिनिधींनी किंवा खासदारांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांना तसा शब्द द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

?s=20

मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या:

केंद्रीय परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणी सरकारने जबाबदारी निश्चित करावी.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

देशातील शिक्षण व्यवस्थेत तातडीने आणि पारदर्शक सुधारणा करण्यात याव्यात.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.