मध्य रेल्वेवरील १३ गाड्या रद्द... या २० गाड्या पर्यायी मार्गाने धावणार...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ जुलै - लोणावळा-कर्जत घाट विभागातील दरड कोसळल्यामुळे बाधित झालेली तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने १८ ते २४ जुलै दरम्यान धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. या सात दिवसांच्या कालावधीत एकूण ३७ एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, १३ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

दोन मार्गिकांवरूनच वाहतूक सुरू
गेल्या ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा-कर्जत घाट विभागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यात रेल्वेच्या तिन्ही मार्गिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत 'मध्य मार्गिका' आणि 'दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका' साफ करून वाहतुकीसाठी खुली केली. सध्या या दोनच मार्गिकांवरून वाहतूक सुरू असून, उर्वरित तिसरी मार्गिका लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे पथक अहोरात्र काम करत आहे.
या कामाचा भाग म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

 रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या (एकूण १३ गाड्या):
या कालावधीत विविध तारखांना खालील प्रमुख गाड्या रद्द राहतील:
चेन्नई एक्सप्रेस
हैदराबाद एक्सप्रेस
दादर - साईनगर शिर्डी एक्सप्रेस
दादर - सातारा एक्सप्रेस
दौंड - इंदूर एक्सप्रेस
हडपसर - जोधपूर एक्सप्रेस
महालक्ष्मी एक्सप्रेस

Advertisement

 पर्यायी मार्गाने धावणाऱ्या गाड्या (एकूण २० गाड्या):
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी २० एक्सप्रेस गाड्या अन्य पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील गाड्यांचा समावेश आहे:
विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
मदुराई - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
कराईकल - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)
लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम
चेन्नई - एकतानगर
सिकंदराबाद - राजकोट
पुणे - सांतरागाछी
सांतरागाछी - पुणे

 'शॉर्ट टर्मिनेशन' आणि 'ओरिजिनेशन' (गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात):
काही गाड्या मुंबईपर्यंत न आणता पुणे किंवा खडकी स्टेशनवरच रोखल्या (Short Terminate) जातील आणि तेथूनच पुन्हा मागे (Short Originate) सोडल्या जातील.
हॉस्पेट - CSMT एक्सप्रेस: ही गाडी मुंबईऐवजी पुणे येथेच आपला प्रवास समाप्त करेल. परत जाताना CSMT - हॉस्पेट एक्सप्रेस मुंबईऐवजी खडकी येथून प्रवास सुरू करेल.
कोल्हापूर - CSMT एक्सप्रेस: ही गाडी मुंबईऐवजी खडकी येथे प्रवास समाप्त करेल. परत जाताना CSMT - कोल्हापूर एक्सप्रेस मुंबईऐवजी पुणे येथून धावणार आहे.

प्रवाशांना आवाहन:
घाटातील काम अत्यंत महत्त्वाचे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने प्रवाशांनी सहकार्य करावे. प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रावर आपल्या गाडीचे लाईव्ह स्टेटस तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.