पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार... देशातील पहिली त्रिस्तरीय रचना आणि मलेशियन तंत्रज्ञान... असे असणार एलिव्हेटेड तीन महामार्ग...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) १९ जुलै - पुणे शहर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी आणि भविष्यातील वाहतुकीची गरज ओळखून आज पुण्याच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या तीन अत्यंत महत्त्वाकांक्षी उन्नत (Elevated) महामार्गांचे भव्य भूमिपूजन आज करण्यात आले. एकूण १३८ किमी लांबीच्या या प्रकल्पांची निर्मिती 'महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे' (MIDC) केली जाणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी या प्रकल्पाचे मूळ नियोजक स्वर्गीय नेते अजित पवार यांच्या दूरगामी संकल्पनेचा आवर्जून उल्लेख केला.

 एकाच खांबावर खाली रस्ता, वर उड्डाणपूल अन् सर्वात वर मेट्रो!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणात सांगितले की, पुण्यात पारंपारिक पद्धतीने रस्ते रुंद करणे शक्य नसल्याने देशात प्रथमच त्रिस्तरीय 'सिंगल पिअर' (एकाच खांबावर आधारित) रचना उभारण्यात येणार आहे.
मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर: या प्रकल्पांसाठी अत्याधुनिक मलेशियन तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामुळे दोन खांबांमधील अंतर थेट १२० मीटरपर्यंत ठेवता येणार आहे. परिणामी, खांबांची संख्या कमी होऊन खर्च आणि बांधकामाचा वेळ दोन्ही वाचणार आहे.
४० टक्के खर्चाची बचत: भविष्यातील मेट्रोचा विचार करून या उन्नत मार्गांचे डिझाईन केल्यामुळे मेट्रोच्या पायाभूत सुविधांवरील सुमारे ४०% खर्च वाचणार आहे.
नवीन पुणे विकसित करण्याचा सल्ला: पुण्याचा ताण कमी करण्यासाठी पुरंदर परिसरात 'नवीन पुणे' विकसित करण्याचा सल्ला गडकरींनी दिला, तसेच पुरंदर विमानतळाचे भूसंपादन ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 भूमिपूजन झालेल्या तिन्ही प्रकल्पांचा सविस्तर तपशील:
प्रकल्पांचे काम DFBOT (Design, Finance, Build, Operate, Transfer) तत्त्वावर २९ वर्षांच्या सवलत कालावधीसाठी दिले गेले असून, यातून शासनाला तब्बल ९५० कोटी रुपयांचा अपफ्रंट प्रीमियम (नफा) मिळणार आहे. हे तिन्ही प्रकल्प पुढील ४ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुणे-शिरूर उन्नत मार्ग (NH-753F)
ठळक वैशिष्ट्ये आणि खर्च
एकूण लांबी: ५३.४ किमी
उन्नत (Elevated) मार्ग: ३५ किमी (६-पदरी) — खराडी जकात नाका ते कोंढापुरी
मेट्रो जोडणी: उन्नत मार्गाच्या दुसऱ्या स्तरावर (Second Tier) ७ किमी लांबीचा मेट्रो मार्ग प्रस्तावित.
विशेषता: हा देशातील पहिला संपूर्ण उन्नत ६-पदरी मार्ग ठरणार आहे.
आर्थिक गणित: स्थापत्य खर्च ₹४,१०४ कोटी (प्रकल्पाचा एकूण खर्च ₹७,५१५ कोटी). यातून शासनाला ₹५०० कोटी अपफ्रंट प्रीमियम मिळणार.

Advertisement

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग (NH-548D)
ठळक वैशिष्ट्ये आणि खर्च
एकूण लांबी: ५३.२ किमी
उन्नत (Elevated) मार्ग: २६.३ किमी (४-पदरी)
जमिनीस समांतर रस्ता: ५३.२ किमी लांबीचा ४-पदरी जमिनीला समांतर महामार्ग.
विशेषता: चाकण आणि शिक्रापूर परिसरातील औद्योगिक वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.
आर्थिक गणित: स्थापत्य खर्च ₹२,९६६ कोटी (प्रकल्पाचा एकूण खर्च ₹३,९२३.८९ कोटी). यातून शासनाला ₹३०० कोटी अपफ्रंट प्रीमियम मिळणार.

हडपसर ते यवत मार्ग (NH-65)
ठळक वैशिष्ट्ये आणि खर्च
एकूण लांबी: ३१.५ किमी
उन्नत (Elevated) मार्ग: २५ किमी (६-पदरी)
जमिनीस समांतर रस्ता: ३१.५ किमी लांबीचा जमिनीला समांतर ६-पदरी महामार्ग.
मेट्रो जोडणी: उन्नत मार्गाच्या दुसऱ्या स्तरावर ९.७५ किमी लांबीचा मेट्रो मार्ग असेल.
आर्थिक गणित: स्थापत्य खर्च ₹३,१७८.३५ कोटी (प्रकल्पाचा एकूण खर्च ₹५,२६२.३६ कोटी). यातून शासनाला ₹१५० कोटी अपफ्रंट प्रीमियम मिळणार.

पुणे हे देशाचे 'ग्रोथ हब' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"पुणे हे महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रमुख आर्थिक विकास केंद्र आहे. रिंगरोड आणि या तीन नवीन उन्नत महामार्गांमुळे पुण्याच्या चारही बाजूंनी वेगवान वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होतील. यामुळे मुख्य शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि ग्रामीण भागात नवीन उद्योगधंद्यांना वाव मिळेल. हे काम चार वर्षांच्या मुदतीआधीच पूर्ण करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत."

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.