३० हजार द्या, नाहीतर गुन्हा दाखल करू... नाशिकमध्ये लाचखोर पोलिसांना 'एसीबी'ने दिला असा जबर दणका...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जुलै - घराशेजारील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बिटको चौकीच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एका पोलीस अंमलदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिलींद हिरामण शेजवळ (वय ५५, रा. जेलरोड, नाशिक रोड) आणि गणेश मुकुंद कुमावत (वय ३८, रा. सामनगाव रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांच्या दाजींनी १५ जुलै २०२६ रोजी घराशेजारील जंगलातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (AD) करण्यात आली असून, त्याचा तपास बिटको चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद शेजवळ आणि पोलीस अंमलदार गणेश कुमावत करत होते.
या तपासाच्या दरम्यान संशयित पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला बिटको पोलीस चौकीत बोलावून घेतले. "तुमच्या दाजीने तुमच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. जर ३० हजार रुपये दिले नाही, तर आम्ही सरकारतर्फे तुमच्यावर दाजीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करू," अशी थेट धमकी देत लाचेची मागणी केली.

Advertisement

'एसीबी'चा बिटको चौकी परिसरात सापळा
गुन्ह्यात अडकण्याच्या भीतीने आणि पोलिसांच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने १८ जुलै २०२६ रोजी या तक्रारीची गुप्त पडताळणी केली असता, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर एसीबीने तत्काळ बिटको पोलीस चौकी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम ३० हजार रुपयांपैकी १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद शेजवळ याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत मदत करणारा दुसरा संशयित पोलीस अंमलदार गणेश कुमावत याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.