गर्भपातास नकार दिल्याने ७ महिन्यांच्या गरोदर तरुणीला बेदम मारहाण...  'लिव्ह-इन'मधील मावस भावाचे कृत्य...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ जुलै - लग्नाचे आमिष दाखवून मावस मामाच्या मुलानेच एका तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात उघडकीस आला आहे. पीडित तरुणी सात महिन्यांची गरोदर असताना, संशयिताने तिचा गर्भपात करण्याचा आग्रह धरला. मात्र, तिने नकार दिल्याने तिला बेदम मारहाण करत वाऱ्यावर सोडून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविराज भुजंग कारके (वय २१, रा. सैलानीबाबा चौक, जेलरोड, नाशिकरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

लव्ह-इन-रिलेशनशिप अन् नंतर क्रूरता
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रविराज हा पीडित तरुणीच्या मावस मामाचा मुलगा आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी पीडिता घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत संशयिताने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर, "माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करू" असे खोटे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या त्रासातून पीडित तरुणी गरोदर राहिली.

Advertisement

हा सर्व प्रकार दोन्ही कुटुंबांना समजल्यानंतर या प्रेमप्रकरणाला तीव्र विरोध करण्यात आला. कौटुंबिक विरोधामुळे दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, फेब्रुवारी २०२६ पासून ते नाशिकरोड येथील कुमावतनगर भागात 'लव्ह-इन-रिलेशनशिप' (सहजीवन) मध्ये राहत होते.

गर्भपातास नकार देताच लग्नास नकार अन् मारहाण
पीडिता गरोदर असल्याने संशयित रविराज तिच्यावर गर्भपात करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. मात्र, पीडित तरुणीने गर्भपात करण्यास स्पष्ट नकार दिला. याचाच राग मनात धरून संशयिताने अचानक लग्नास नकार दिला आणि तिला बेदम मारहाण केली. अत्यंत अमानुषपणे, सात महिन्यांच्या गरोदर अवस्थेत तिला एकटे सोडून तो फरार झाला.
शेवटी हतबल झालेल्या पीडित तरुणीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. तिच्या तक्रारीवरून संशयित रविराज कारके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.