नाशिक रिंग रोड भूसंपादन... शेतकऱ्यांना आतापर्यंत दिले तब्बल ४१० कोटी... या गावात आले शंभरावे खरेदी खत...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १८ जुलै - सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) मार्फत खाजगी वाटाघाटीद्वारे सुरू असलेल्या प्रक्रियेत मौजे बेळगाव ढगा येथील प्रकाश नामदेव पवार यांच्या जमिनीचे खरेदीखत पूर्ण होऊन खरेदी प्रक्रियेचे शतक (१०० वे खरेदीखत) पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे ४१० कोटी रुपये किमतीच्या जमिनीची थेट खरेदी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. १०० वे खरेदीखत पूर्ण झाल्याप्रसंगी MSIDC चे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी, उपअभियंता बिरारीस आणि विधी अधिकारी गुंजाळ उपस्थित होते. शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रकल्पाला गती येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष सुनावणीत दोन दिवसांत २६४ अर्ज

भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी १६ व १७ जुलै रोजी विशेष सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या सुनावणीला बाधित शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दोन दिवसांत एकूण २६४ अर्ज व हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

१६ जुलै (पहिले सत्र): बेळगाव ढगा, मखमलाबाद, पिंपळगाव बहुला, विहितगाव, चांदशी यांसह विविध गावांमधून ८३ अर्ज आले.

Advertisement

१७ जुलै (दुसरे सत्र): पाथर्डी (सर्वाधिक ४८ अर्ज), आडगाव (३१), माडसांगवी (२८), वडनेर दुमाला (१९) यांसह इतर गावांमधून १८१ अर्ज प्राप्त झाले. महादेवपूर, जलालपूर आणि मानोरी येथून एकही हरकत आली नाही.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?

सुनावणीदरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये प्रामुख्याने वाढीव मोबदला मिळणे, बागायती दर लागू करणे, संपादित क्षेत्रातील दुरुस्ती, संयुक्त पुनर्मोजणी करणे आणि जमिनीच्या मूल्यनिर्धारणा संदर्भातील हरकतींचा समावेश आहे. या सर्व अर्जांची विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर छाननी करून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.