शनिवारच्या पाणी कपातीबाबत नाशिक महापालिकेने घेतला हा निर्णय... तातडीने अंमलबजावणी होणार...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १७ जुलै - नाशिककरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दर शनिवारी केली जाणारी पाणी कपात आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेला समाधानकारक पाऊस आणि महासभेत लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, उद्यापासून (शनिवार, दि. १८ जुलै २०२६) नाशिक शहराचा शनिवारचा पाणी पुरवठा पूर्ववत सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभागाने आज एका जाहीर निवेदनाद्वारे यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली.

पाणी कपातीची पार्श्वभूमी आणि महापौरांचे निर्देश

Advertisement

नाशिकमधील पाणी साठ्याची स्थिती पाहता, शासन, महापौर आणि मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार गेल्या १७ जून २०२६ पासून संपूर्ण नाशिक शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत होता. मात्र, सध्या धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. आज (दि. १७ जुलै) झालेल्या मनपाच्या महासभेत या पाणी टंचाईवर सविस्तर चर्चा झाली. धरण क्षेत्रातील सद्यस्थिती आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन मा. महापौर यांनी शनिवारची पाणी कपात तातडीने मागे घेण्याचे व पाणी पुरवठा नियमित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

सर्व नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी नोंद घ्यावी

महापौरांच्या निर्देशानुसार आता शनिवार, दि. १८ जुलै २०२६ पासून नाशिक शहराच्या सर्व भागांत शनिवारचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे नियमित सुरू राहणार आहे. पाणी कपातीच्या काळात नाशिक महानगरपालिकेला अत्यंत संयमाने सहकार्य केल्याबद्दल मनपा प्रशासनाने सर्व लोकप्रतिनिधी आणि नाशिककर नागरिकांचे आभार मानले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.