एस.के. खेडकर, (नाशिक) १७ जुलै - नाशिकमधून पोलिसांना हुलकावणी देत भरधाव वेगाने पसार झालेल्या एका संशयित ब्रिझा कारचा तब्बल ६० किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) दोन आंतरराज्य मद्यतस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव शिवारात दोन्ही तस्करांना कारसह ताब्यात घेण्यात आले. या धडक कारवाईत कार आणि राज्यात बंदी असलेला केंद्रशासित प्रदेशातील विदेशी मद्यसाठा, असा एकूण १४ लाख ६५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिपेशकुमार शंकरभाई राठोड व फिलीपभाई अगरीयाभाई गमोत अशी अटक करण्यात आलेल्या मद्यतस्करांची नावे असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मखमलाबाद शिवारात संशय बळावला
एक्साईजच्या 'अ' विभाग भरारी पथकाचे अधिकारी बुधवारी (दि. १५) रात्री मखमलाबाद शिवारात गस्त घालत होते. मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोडवरील राहू हॉटेल जवळील हनुमाननगर भागात एका गुजरात पासिंगच्या ब्रिझा कारमधून (GJ 05 RP 3004) एक तरुण हातामध्ये काळ्या पिशव्या घेऊन खाली उतरल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याच्या दिशेने कूच करताच, त्या तरुणाने हातातील पिशव्या तिथेच टाकल्या आणि कारमध्ये बसून वाहन थेट दिंडोरीच्या दिशेने भरधाव वेगाने दामटले. पोलिसांनी टाकलेल्या पिशव्यांची पाहणी केली असता, त्यात केंद्रशासित प्रदेशातील विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
वणीमार्गे बोरगावपर्यंत थरार, अशा आवळल्या मुसक्या
तस्कर पळून जात असल्याचे स्पष्ट होताच नाशिकच्या भरारी पथकाने तात्काळ कारचा पाठलाग सुरू केला. संशयित कार म्हसरूळवरून दिंडोरी मार्ग ओलांडून वणीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात येताच, नाशिक पथकाने बोरगाव सीमा तपासणी नाका पथकाला सतर्क केले.
बोरगाव सीमा नाका पथकातील काही कर्मचाऱ्यांनी वणीच्या दिशेने धाव घेतली, तर नाशिकहून पाठलाग करत आलेले 'अ' विभाग भरारी पथक बोरगाव शिवारात पोहोचले. दोन्ही बाजूने पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात मद्यतस्करांची कार अडकली आणि पोलिसांनी फिल्मी स्टाईलने दोघांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेंद्र देशमुख, अप्पर आयुक्त विश्वनाथ इंदिसे, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत 'अ' विभागाचे निरीक्षक किशोर पाटील, दुय्यम निरीक्षक दत्तू कोळपे, प्रवीण देशमुख, भूषण वाणी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सोनाली चंद्रमोरे, जवान युवराज रतवेकर, राकेश पगारे, पूनम बालेराव, भालचंद्र वाघ, सुनील दिघोळे तसेच बोरगाव नाक्याचे निरीक्षक संतोष पांचाळ, दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, जवान अजय बगर, तेजस कसबे व सुनील पाटील आदींच्या संयुक्त पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.