अंगावर काटा आणणारा प्रकार... जादूटोणा अन् फिनाईल पाजून विवाहितेच्या खूनाचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ जुलै - धोंड्याच्या महिन्यात (अधिक मासात) जावयाला सोन्याची अंगठी दिली नाही या शुल्लक कारणावरून पतीसह सासरच्या मंडळीने विवाहितेचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. पीडितेला अघोरी कृत्याला सामोरे जावे लागले असून, तिला जबरदस्तीने फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या छळाला कंटाळून माहेरी धाव घेतलेल्या पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

छळ आणि अमानुषतेची सीमा पार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास आहे. विवाहानंतर पतीसह अमरावती येथील सासरे आणि नणंद यांनी तिला किरकोळ घरगुती कारणांवरून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
पीडित महिला पतीसोबत हैदराबाद येथे राहत असताना, माहेरच्यांनी धोंड्याच्या महिन्यात सोन्याची अंगठी दिली नाही या कारणावरून तिला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या अंगावरील सर्व स्त्रीधन (दागिने) बळजबरीने काढून घेण्यात आले. हा संपूर्ण प्रकार मार्च ते जून दरम्यान सुरू होता.

फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

छळाची सीमा ओलांडत गेल्या २९ जून रोजी पीडितेला बळजबरीने फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जीवघेण्या प्रसंगातून वाचल्यानंतर पीडितेने कसेबसे माहेर गाठले आणि पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर पंचवटी पोलिसांनी पती आणि सासरच्या इतर नातेवाईकांविरोधात शारीरिक व मानसिक छळ, खुनाचा प्रयत्न आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पंचवटी पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे:
"भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यातील भोंदूगिरीचा हा ९ वा गुन्हा दाखल झाला आहे. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होण्याचे राज्यातील नाशिकचे हे प्रमाण सध्या प्रथम स्थानावर आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून, सदर गुन्ह्यातील संबंधित भोंदूला पोलिसांनी तात्काळ शोधून ताबडतोब अटक करावी, अशी मागणी 'अंनिस' करत आहे."

Advertisement

Comments

No comments yet.