मनोहर शिंदे, (नाशिक) १७ जुलै - आगामी सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रस्तावित महत्त्वाकांक्षी ‘परिक्रमा मार्ग’ (रिंग रोड) प्रकल्पाच्या भूसंपादनाने वेग घेतला आहे. या अंतर्गत मौजे जलालपूर (ता. नाशिक) येथील गट क्रमांक ५७ मधील जमिनीचे खरेदीखत खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. संबंधित महिला जमीनधारकाला शासनाकडून तब्बल २ कोटी २६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा मोबदला सुपूर्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
थेट खरेदी पद्धतीला नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या माध्यमातून परिक्रमा मार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची थेट खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण आणि नाशिकच्या विकासाला गती देणाऱ्या प्रकल्पासाठी जमीनधारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जलालपूर येथील गट क्रमांक ५७ मधील ०.२१ हेक्टर आर क्षेत्रासाठी श्रीमती मथुरा एन. वनसे यांनी संमती दर्शवली होती.
सव्वा दोन कोटींच्या मोबदल्याचा धनादेश सुपूर्द
सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता यांच्या उपस्थितीत सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे खरेदीखत करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती मथुरा एन. वनसे यांना भूसंपादनाचा एकूण २ कोटी २६ लाख ३६ हजार १६५ रुपयांचा मोबदला धनादेशाद्वारे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या संपूर्ण खरेदी प्रक्रियेचे नियोजन व समन्वय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे यांनी केले.
कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होणार: जिल्हाधिकारी
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी श्रीमती मथुरा वनसे यांचे विशेष अभिनंदन केले. जमीनधारकांच्या या सकारात्मक सहभागामुळे भूसंपादनाला गती मिळत असून, सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या दृष्टीने सर्व पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यास यामुळे मोठी मदत होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.