बनावट हेल्मेट विक्रेत्यांवर छापा... ग्राहकांनो, खरेदीपूर्वी हे नक्की तपासा...

Share:
Main Image
Last updated: 16-Jul-2026

नागपूर, (प्रतिनिधी) १६ जुलै - दुचाकीस्वारांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या नागपुरातील एका हेल्मेट विक्रेत्यावर भारतीय मानक ब्युरोने (BIS) मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'बीआयएस'च्या पथकाने नागपुरातील एका दुकानातून अनिवार्य 'आयएसआय' (ISI) चिन्ह नसलेली ३८ हेल्मेट जप्त केली आहेत. हा साठा 'दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, २०२०' आणि 'भारतीय मानक ब्युरो अधिनियम, २०१६' मधील तरतुदींचे सरळ-सरळ उल्लंघन करून विकला जात होता.

'डीजे हेल्मेट शॉप'वर धडक कारवाई

नागपुरातील कपिल नगर, नारी रिंग रोड येथील कल्पना कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या 'डीजे हेल्मेट शॉप' विरोधात ब्युरोकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत १५ जुलै २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी या दुकानात शोध आणि जप्तीची मोहीम राबवली.

या कारवाईदरम्यान पथकाला वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या नावाखाली विकली जाणारी, पण अनिवार्य 'ISI' मार्क नसलेली एकूण ३८ दुचाकी हेल्मेट मिळून आली. यामध्ये खालील ब्रँड्सचा समावेश आहे:

'रिषभ' ब्रँड: २७ हेल्मेट

Advertisement

'एमएएस' ब्रँड: ९ हेल्मेट

'स्टॉर्म' आणि 'ओशन' ब्रँड: प्रत्येकी १ हेल्मेट

कायदेशीर कारवाई सुरू:

नियमांचे उल्लंघन करून विकण्यात येणारी ही सर्व हेल्मेट पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून जप्त करण्यात आली आहेत. तसेच भारतीय मानक ब्युरो अधिनियम, २०१६ अंतर्गत संबंधित दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ग्राहकांनो, खरेदीपूर्वी परवाना तपासा!

ग्राहकांच्या जिवाचे आणि हिताचे संरक्षण करण्यासाठी बीआयएस कटिबद्ध असल्याचे ब्युरोने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून, कोणतीही अनिवार्य बीआयएस प्रमाणन (ISI मार्क) असलेली उत्पादने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी 'बीआयएस केअर ॲप' (BIS Care App) किंवा ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित परवान्याची सत्यता आणि गुणवत्ता नक्की पडताळून पाहावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.