नाशिक, (प्रतिनिधी) १५ जुलै - विवाहानंतर पतीसोबत विदेशात जाण्याच्या नावाखाली सुनेने तिच्या आई-वडिलांच्या मदतीने सासू-सासऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. वृद्धापकाळासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर जमा केलेली पुंजी दोन ते अडीच वर्षे उलटूनही परत न केल्याने अखेर हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्तीची पुंजी लाटली
मिळालेल्या माहितीनुसार, चांदशी शिवारातील रेझरोड हॉटेल भागात राहणाऱ्या एका ५६ वर्षीय सासूने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचा मुलगा कॅनडामध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्याचा विवाह झाल्यानंतर सुनेच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला कॅनडाला पतीसोबत नांदायला पाठवण्यासाठी सासू-सासऱ्यांकडे आग्रह धरला होता.
व्हिसा आणि विदेशवारीसाठी लागणारा सर्व खर्च आम्ही नंतर परत करू, असे आश्वासन सुनेच्या आई-वडिलांनी दिले होते. व्याही आणि विहिणीच्या शब्दावर विश्वास ठेवून वृद्ध दाम्पत्याने आपल्या सेवानिवृत्तीची (रिटायरमेंटची) रक्कम आणि आयुष्यभराची जमापुंजी मिळून एकूण ३ लाख ८२ हजार रुपये सुनेच्या कॅनडा प्रवासावर खर्च केले.
पैसे मागताच नकार
सून कॅनडाला पोहोचून दोन ते अडीच वर्षांचा काळ उलटून गेला, मात्र तिच्या माहेरच्या लोकांकडून एक रुपयाही परत करण्यात आला नाही.
सासू-सासऱ्यांनी पैशांची निकड असल्याने सुनेच्या आई-वडिलांकडे आपल्या हक्काच्या रकमेची मागणी केली. मात्र, संशयितांनी सदरचे पैसे देण्यास साफ नकार दिला आणि फसवणूक केली.
गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित सासूने गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुनेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.