दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १४ जुलै - जिल्ह्यातील नागरी भागांमध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित आणीबाणीच्या परिस्थितीला जलद व प्रभावीपणे तोंड देण्यासाठी अत्याधुनिक 'आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता वाहन' (Emergency Response Sanitation Unit - ERSU) नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या विशेष वाहनाचे भव्य लोकार्पण आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. या सोहळ्याला खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नगरपालिका शाखेचे सहाय्यक आयुक्त शाम गोसावी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मॅनहोल तपासणीसाठी 'सीसीटीव्ही'सह अत्याधुनिक उपकरणांची जोड
जिल्ह्यातील स्वच्छता यंत्रणा अधिक हायटेक करणाऱ्या या ईआरएसयू (ERSU) वाहनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील सुविधा उपलब्ध आहेत:
उच्च क्षमतेची यंत्रणा: उच्च क्षमतेची जेटिंग प्रणाली, सक्शन यंत्रणा आणि पॉवर रॉडिंग मशीन.
सुरक्षा व तपासणी: मॅनहोल तपासणीसाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेरा, धोके ओळखण्यासाठी गॅस डिटेक्टर, जनरेटर आणि विंच.
आपत्कालीन साहित्य: उच्च क्षमतेचा डायव्हर्टिंग पंप, बचाव कार्य व आपत्कालीन साहित्य आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने (PPE Kits).
मनुष्यबळाचा धोका टळणार; कर्मचाऱ्यांची सुरक्षा अबाधित
या अत्याधुनिक वाहनामुळे सीवर लाईनमधील (गटारींमधील) कठीण अडथळे दूर करणे आणि सांडपाणी व्यवस्थेतील बिघाडांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दूषित पाणी किंवा मॅनहोलमध्ये उतरताना सफाई कर्मचाऱ्यांच्या जिवाला असणारा धोका आता पूर्णपणे टळणार असून सुरक्षित व कार्यक्षम सेवा उपलब्ध होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठे तांत्रिक बळ
या वाहनाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापनातील आणीबाणीच्या प्रसंगी होणार आहे. यामुळे जिल्ह्याची स्वच्छता व्यवस्था अधिक गतिमान आणि बळकट होण्यास मदत होईल.