वंदे भारतची वाट पाहत नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उभा होता... मोबाईल कॉल आला आणि तेवढ्यात...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १४ जुलै - नाशिकरोड रेल्वे स्थानकावर मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या एका प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग हातोहात लांबवणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला नाशिकरोड लोहमार्ग (रेल्वे) पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. रेल्वे स्थानकावरील अत्याधुनिक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या फुटेजचे विश्लेषण करून पोलिसांनी बिहारच्या या भामट्याला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून ७० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि चार्जर जप्त केला आहे. धर्मेंद्रकुमार रामलाल महतो (वय २८, रा. चमणपुरा, जि. गोपालगंज, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी गोकुळ नायर (रा. गणेशनगर, सातपूर, नाशिक) यांनी रेल्वे पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

लक्ष विचलित होताच बॅग लंपास

फिर्यादी गोकुळ नायर हे एका नामांकित पेट्रोल कंपनीत उच्च पदावर नोकरीस आहेत. रविवारी (१२ जुलै) ते 'वंदे भारत एक्सप्रेस'ने मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आले होते. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील प्रवाशांच्या बाकावर बसून ते मोबाईलवर बोलत होते.

त्यांनी आपली लॅपटॉप बॅग बाजूलाच ठेवली होती. नायर हे बोलण्यात मग्न असल्याचे पाहून आणि त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून संशयित धर्मेंद्रकुमार महतो याने त्यांची लॅपटॉप बॅग चोरून पोबारा केला. या बॅगेत लॅपटॉप, चार्जर, साडेपाच हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती.

सीसीटीव्ही फुटेज ठरले उपयुक्त

Advertisement

बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच नायर यांनी तातडीने नाशिकरोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये एक संशयित तरुण बॅग घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या पथकांद्वारे रेल्वे स्थानक परिसर आणि बाहेर शोधमोहीम राबवून अवघ्या काही तासांत या बिहारी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेली बॅग व त्यातील ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कारवाई छत्रपती संभाजीनगरचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि मनमाडचे उपविभागीय अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथक:

लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, सचिन देवे, रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) निरीक्षक नवीन प्रताप, आरपीएफ प्रधान आरक्षक सागर वर्मा आणि एमएसएफ (MSF) चे राहुल चौधरी यांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी बजावली.

Advertisement

Comments

No comments yet.