दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १४ जुलै - येथील नामको हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने (NICU) वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत आव्हानात्मक मोहिमेत यश मिळवले आहे. केवळ ६२५ ग्रॅम वजनाच्या, अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या नवजात बाळावर यशस्वी उपचार करून त्याला जीवदान देण्याची उल्लेखनीय कामगिरी नामकोच्या वैद्यकीय चमूने केली आहे. विशेष म्हणजे, या बाळावरील संपूर्ण उपचार शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.
अनेक रुग्णालयांनी फिरवली होती पाठ
हे बाळ घरीच मुदतपूर्व (Pre-term) जन्माला आले होते. अत्यंत कमी वजन आणि गंभीर प्रकृती असल्यामुळे नाशिकमधील अनेक नामांकित रुग्णालयांनी या बाळावर उपचार करण्यास असमर्थता दर्शवली होती. अशा परिस्थितीत एका गरीब आदिवासी कुटुंबातील हताश पालकांनी शेवटची आशा म्हणून नामको हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नामकोचे बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. निखिल कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने बाळाला तत्काळ दाखल करून घेत उपचार सुरू केले.
६२५ ग्रॅमवरून वजन १,३१० ग्रॅमवर!
सुमारे दोन महिने नामकोच्या 'एनआयसीयू' विभागात बाळावर अहोरात्र आणि अतिदक्षतेने उपचार करण्यात आले. रुग्णालयातील जागतिक दर्जाचे व्हेंटिलेटर्स, आधुनिक इन्क्युबेटर्स आणि अत्याधुनिक सुविधांच्या जोरावर डॉक्टरांनी बाळाची प्रकृती यशस्वीपणे सुधारली. उपचाराला सुरुवात झाली तेव्हा बाळाचे वजन अवघे ६२५ ग्रॅम होते, तर दोन महिन्यांच्या उपचारानंतर डिस्चार्जच्या वेळी ते तब्बल १,३१० ग्रॅम झाले. बाळाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर ११ जुलै रोजी त्याला आनंदाने घरी सोडण्यात आले.
नैसर्गिक पोषणावर भर
"अशा अतिशय कमी वजनाच्या बाळांना संसर्गापासून (Infection) वाचवणे आणि २४ तास देखरेख ठेवणे हे मोठे आव्हान असते. या बाळावर उपचार करताना त्याला कोणतेही कृत्रिम दूध न देता, केवळ आईचे दूध देण्यात आले. आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार बाळाची योग्य वाढ झाली असून त्याचे सर्व अवयव उत्तम प्रकारे कार्य करत आहेत," अशी माहिती डॉ. निखिल कुलकर्णी यांनी दिली.
पालकांचे डोळे पाणावले; हॉस्पिटल प्रशासनाकडून कौतुक
शासकीय योजनेमुळे लाखो रुपयांचा खर्चिक उपचार पूर्णपणे मोफत झाल्याने गरीब आदिवासी पालकांनी नामको हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे हात जोडून आभार मानले. या यशस्वी कामगिरीबद्दल नामको चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन सोहनलाल भंडारी आणि सचिव शशिकांत पारख यांनी डॉ. कुलकर्णी व संपूर्ण पॅरामेडिकल स्टाफचे कौतुक केले, तसेच बाळाला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.