अतिशय धक्कादायक... डिटर्जंट, पाम तेल आणि घातक रसायनांद्वारे बनवले दूध... कोट्यवधी लिटर सर्रास विक्री...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

धाराशिव, (प्रतिनिधी) १४ जुलै - जिल्ह्यातील भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून मानवी आरोग्याला घातक असणारे कृत्रिम (सिंथेटिक) दूध तयार केले जात असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या कागदपत्रांवरून तब्बल २.३ कोटी लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध राज्यभरात वितरित झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

६ महिन्यांत २३ लाख लिटर सिंथेटिक दुधाची निर्मिती!

तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या विक्री नोंदवहीच्या प्राथमिक विश्लेषणातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जप्त केलेल्या नोंदीनुसार, गेल्या सहा महिन्यांत निकृष्ट दर्जाच्या दूध पावडरचा वापर करून सुमारे २३ लाख लिटर सिंथेटिक दूध तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. या कृत्रिम दुधाची बाजारातील किंमत तब्बल ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, प्रत्येक १०० लिटर शुद्ध दुधामध्ये सुमारे १० लिटर सिंथेटिक दूध मिसळून त्याचा पुरवठा केला जात होता. या गणितानुसार, शुद्ध दुधाच्या नावाखाली राज्यभरातील ग्राहकांच्या पदरात २.३ कोटी लिटरहून अधिक विषारी भेसळयुक्त दूध पडल्याचा संशय अधिकारी व्यक्त करत आहेत.

डिटर्जंट आणि पाम तेलाचा घातक खेळ!

हे कृत्रिम दूध हुबेहूब नैसर्गिक दिसावे आणि त्यातील फॅटचे प्रमाण (Fat Content) टिकून राहावे, यासाठी अत्यंत भयानक घटकांचा वापर केला जात होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार:

डिटर्जंट पावडर (फेसासाठी आणि पांढऱ्या रंगासाठी)

पाम तेल (फॅट वाढवण्यासाठी)

Advertisement

निकृष्ट दर्जाची रासायनिक पावडर

आरोग्यावर काय परिणाम होतो?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा रासायनिक मिश्रणाचे दीर्घकाळ सेवन केल्यास मानवी शरीरातील यकृत (Liver), मूत्रपिंड (Kidney) आणि पचनसंस्थेवर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

'SIT' कडून तपास वेगात; आरोपी अद्याप फरार

या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी एकूण ७ जणांविरोधात कठोर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पोलिसांकडून आरोपींच्या संभाव्य अड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ६१ पोती संशयित भेसळयुक्त दूध पावडर जप्त केली आहे. प्राथमिक चौकशीनुसार, जनावरांच्या खाद्याच्या नावाखाली हा गोरखधंदा चालवला जात होता. ही पावडर भूम परिसरातील अनेक डेअरी युनिट्स आणि दूध संकलन केंद्रांना पुरवली जात होती.

जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद

अन्न सुरक्षा कायद्यानुसार (FSSA), मानवी जिवाला धोका निर्माण करणारी दूध भेसळ सिद्ध झाल्यास संबंधित दोषींना १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि थेट जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणातील मूळ सूत्रधार पकडल्यानंतर राज्यातील दूध पुरवठा साखळीतील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Comments

No comments yet.