कळवणच्या व्यावसायिकाला १६ लाखांचा गंडा... फेसबुकद्वारे असा घडला सारा प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 13-Jul-2026

कळवण, (प्रतिनिधी) १३ जुलै - सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातीची भुरळ ग्रामीण भागातील एका व्यावसायिकाला चांगलीच महागात पडली आहे. घर बांधण्यासाठी होलसेल भावात स्टील (लोखंड) खरेदी करून देतो, असे सांगून एका भामट्याने कळवण तालुक्यातील व्यावसायिकाची तब्बल १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात पुणे येथील एका ठकबाजाविरोधात फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवरील जाहिरात पडली महाग

या प्रकरणी रवींद्र विजय पवार (रा. हुंड्यामोख, ता. कळवण) या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पवार यांचे गावातच किराणा दुकान आहे. सन २०२४ मध्ये पवार यांना नवीन घर बांधायचे असल्याने, ते फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोखंड खरेदी-विक्री करणाऱ्या विविध जाहिराती शोधत होते. फेसबुकवर एकाच जाहिरातीची त्यांनी वारंवार पाहणी केल्याचे हेरून सायबर भामट्यांनी २२ ऑगस्ट रोजी त्यांच्याशी संपर्क साधला.

बँक खात्यात भरले १६ लाख; दोन वर्षे उलटूनही माल मिळेना

Advertisement

संशयित आरोपीने पवार यांना अत्यंत स्वस्त आणि होलसेल दरात स्टील मिळवून देण्याची मोठी ग्वाही दिली. त्याचा बोलण्यावर विश्वास बसल्याने पवार त्याच्या आमिषाला बळी पडले. संशयिताच्या सांगण्यानुसार, पवार यांनी जाफर अली तांबोळी याच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात वेळोवेळी एकूण १६ लाख १० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन वर्ग केली. मात्र, पैसे घेऊन दोन वर्षे उलटली तरी संशयिताने स्टील पाठवले नाही. पवार यांनी वारंवार संपर्क साधूनही तांबोळीकडून केवळ टोलवाटोलवीची उत्तरे मिळत राहिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

पुण्याच्या ठकबाजावर गुन्हा दाखल

रवींद्र पवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जाफर अली तांबोळी (रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) या संशयित ठकबाजाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करत आहेत.

सायबर पोलिसांचे आवाहन: सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवून अनोळखी व्यक्तींच्या बँक खात्यात मोठी रक्कम वर्ग करू नये. कोणत्याही व्यवहारापूर्वी संबंधित कंपनी किंवा व्यक्तीची प्रत्यक्ष शहानिशा करणे गरजेचे आहे.

Advertisement

Comments

No comments yet.