रायगड जिल्ह्यात संतापजनक घटना... रस्त्याअभावी गर्भवतीची परवड... झोळीतून वाहतुकीचा व्हिडीओ समोर...

Share:
Main Image
Last updated: 13-Jul-2026

रायगड, (प्रतिनिधी) १३ जुलै -  रायगड जिल्ह्यातील खालापूर मतदारसंघात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी चक्क झोळीतून खांद्यावर वाहून नेण्याची संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खालापूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांवर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे महायुती सरकारच्या 'कथित विकासाचा' बुरखा फाडत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

"हा कसला विकास?" रोहित पवारांचा थेट सवाल

खालापूर मतदारसंघातील या दुरवस्थेवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, "खालापूर मतदारसंघातील हा 'विकास' बघा! रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून खांद्यावर नेण्याची वेळ आली आहे, हाच का यांचा विकास? विशेष म्हणजे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री (अदिती तटकरे) या स्वतः रायगड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याच गृहजिल्ह्यात जर महिलांची ही अवस्था असेल, तर इतर जिल्ह्यांबाबत न बोललेलंच बरं!"

गोव्यातील 'त्या' डान्सचा काढला दाखला

Advertisement

सत्ताधारी आमदारांवर थेट हल्लाबोल करताना रोहित पवार यांनी दोन वर्षांपूर्वीच्या राजकीय घडामोडींची आठवण करून दिली. "माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर, कथित विकासासाठी शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेल्या खालापूरच्या लोकप्रतिनिधींचा गोव्यातील हॉटेलमध्ये टेबलवर उभं राहून नाचतानाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल..." असा खोचक टोला त्यांनी लगावला. जे लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी टेबलवर नाचले, त्यांना आज मतदारसंघात रुग्णावाहिका जाण्याइतपत रस्ताही तयार करता आलेला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

'झोळी' प्रवासाने आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे

रायगड जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात आजही पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात आदिवासी आणि ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रचंड हाल होतात. खालापूरमधील या गर्भवती महिलेला ऐन वेदना सुरू असताना गावातील तरुणांनी कपड्याची झोळी करून मुख्य रस्त्यापर्यंत आणले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे निघाले असून, यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.