नाशिक, (प्रतिनिधी) १२ जुलै - लहवित शिवारात एका मजुराची लोखंडी पहारीने मारहाण करून हत्या केल्यानंतर तब्बल अडीच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ पथकाला यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मध्यप्रदेशात दोन दिवस तळ ठोकून अत्यंत शिताफीने ही कारवाई केली. गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०, रा. बेरछा सिवाना, ता. भिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना ७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित येथील रेल्वे लाईनवरील पोल क्र. १७४११३१५ परिसरात घडली होती. या प्रकरणातील फिर्यादी युवक, त्यांचे वडील आणि इतर नातेवाईक येथे मजुरीचे काम करत होते. दुपारच्या सुमारास काम आटोपून सर्व जण घरी जाण्याच्या तयारीत असताना, फिर्यादी पाणी पीत होते.
त्याच वेळी संशयित गुलाबसिंग आखाडे हातात लोखंडी पहार घेऊन तिथे आला आणि त्याने कुठलेही कारण नसताना फिर्यादीच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यावर आणि पाठीवर वर्मी घाव बसल्याने वडील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. मुलगा वडिलांच्या मदतीला धावून गेला असता संशयिताने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तो तिथून पसार झाला. गंभीर जखमी वडिलांना तातडीने देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपी सतत पोलिसांना गुंगारा देत असल्याने हा तपास प्रलंबित होता. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. दरम्यान, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी मध्यप्रदेशात असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ चे पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.
आरोपी पकड टाळण्यासाठी मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या भागात सतत कामाच्या निमित्ताने जागा बदलत होता. पोलिसांनी तिथे सलग दोन दिवस तळ ठोकून अखेर महेश्वर तालुक्यातील चोली मंडलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुलाबसिंगला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, जमादार गुलाब सोनार, हवालदार प्रदीप नन्नवरे, अंमलदार संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहाय्यक निरीक्षक जया तारडे यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.