नवी दिल्ली, (ऑनलाइन डेस्क) १२ जुलै - सार्वजनिक वाहतुकीत सुट्ट्या पैशांवरून चालक-कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये रोजच वाद होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या तक्रारींमधील नेमके सत्य काय आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी शनिवारी तोंडाला मास्क लावून एका सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणे बसने प्रवास केला. मात्र, या 'रियालिटी चेक'दरम्यान मंत्र्यांनाच अत्यंत धक्कादायक आणि अपमानकारक अनुभव आला. तिकीटासाठी सुट्टे पैसे न दिल्याने एका कंडक्टरने चक्क परिवहन मंत्र्यांनाच चालत्या बसमधून खाली उतरण्यास सांगितले. कंडक्टरच्या या मनमानी कारभाराचा फटका स्वतः मंत्र्यांनाच बसल्याने, अवघ्या दोन तासांत संबंधित बस चालक आणि कंडक्टरला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
१०० रुपयांची नोट दिली अन्...
शनिवारी मंत्री बायराथी सुरेश यांनी मास्क लावून प्रवास केल्यामुळे बसमधील कंडक्टर त्यांना ओळखू शकला नाही. प्रवासादरम्यान कंडक्टरने तिकीटासाठी सुट्ट्या पैशांची मागणी केली. मंत्र्यांकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी १०० रुपयांची नोट दिली. यावर संतापलेल्या कंडक्टरने सुट्टे पैसे देण्यास नकार दिला आणि मंत्र्यांना थेट चालत्या बसमधून खाली उतरण्याचा हुकूम सोडला. प्रवाशांना रोज कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते, याचा जिवंत पुरावाच मंत्र्यांच्या रूपाने समोर आला.
दोन तासांत १० बसेसमधून प्रवास
या प्रवासादरम्यान मंत्र्यांना आणखी एक वाईट अनुभव आला. एका बस स्टॉपवर प्रवासी उभे असतानाही चालकाने बस न थांबवता पुढे पळवली. परिवहन मंत्र्यांनी तब्बल २ तासांत वेगवेगळ्या १० पेक्षा जास्त बसमधून प्रवास केला आणि प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. या अचानक केलेल्या तपासणीनंतर (Surprise Visit) प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या संबंधित चालक आणि कंडक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी अशा अचानक तपासण्या यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा मंत्र्यांनी दिला आहे.
ऑटो रिक्षा चालकाची दादागिरीही पकडली!
बसमधून उतरल्यानंतर मंत्री बायराथी सुरेश यांना एका रिक्षा चालकाची दादागिरीही पाहायला मिळाली. बस स्थानकाबाहेर एका ऑटो-रिक्षा चालक आणि प्रवाशामध्ये भाड्यावरून जोरदार वाद सुरू होता. मंत्र्यांनी सामान्य नागरिक म्हणून या वादात मध्यस्थी केली. तेव्हा रिक्षाच्या मीटरवर केवळ ३० रुपये भाडे दिसत असतानाही, रिक्षा चालक प्रवाशाकडे बेकायदेशीरपणे ३६ रुपयांची मागणी करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणीही आता आरटीओमार्फत कडक कारवाई केली जात आहे.