नाशिक, (प्रतिनिधी) ११ जुलै - सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वेळेत सोडविणे, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामांना गती देणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक महत्त्वपूर्ण लोकाभिमुख उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोमवार, दि. १३ जुलै २०२६ पासून राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे दर सोमवारी "सकाळी ११ ते दुपारी २" या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा.ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न मांडण्यासाठी सहज उपलब्ध व्यासपीठ निर्माण करून त्यांचे प्रभावीपणे निवारण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
अनेक वेळा नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित कामांसाठी वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. काही प्रकरणांमध्ये योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे किंवा प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांची कामे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहतात. अशा सर्व प्रश्नांवर आवश्यक मार्गदर्शन, संबंधित विभागांशी समन्वय तसेच योग्य स्तरावर प्रभावी पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी, निवेदने आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित अडचणींची नोंद करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाणार आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नागरिकांना आवश्यक सहकार्य करून त्यांच्या प्रश्नांच्या निवारणासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहेत.
याबाबत जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे म्हणाले, "राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे हीच खरी लोकसेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची कामे वेळेत व्हावीत, शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा आणि त्यांच्या अडचणींसाठी त्यांना विश्वासाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाचे गांभीर्याने ऐकून त्याच्या निवारणासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल, अशी लोकसेवा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे."
नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी, तक्रारी, सूचना तसेच विविध योजनांबाबतच्या समस्या घेऊन दर सोमवारी "सकाळी ११ ते दुपारी २" या वेळेत राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे उपस्थित राहून या लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.