मनोहर शिंदे, ((नाशिक) ११ जुलै - देशाच्या संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला बळ देण्यासाठी आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक एमएसएमई (MSME) उद्योगांना थेट संरक्षण उत्पादन साखळीशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली दोन दिवसीय 'एचएएल व्हेंडर डेव्हलपमेंट मीट-२०२६' अत्यंत उत्साहात संपन्न झाली. नाशिक डिस्ट्रिक्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) तर्फे आयोजित या विशेष कार्यशाळेत सुमारे ३०० उद्योजकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) साठी आवश्यक विमान व एरोस्पेस घटकांच्या निर्मितीसाठी नवीन उत्पादन उद्योग सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती 'निमा'चे अध्यक्ष आशिष नहार यांनी समारोपप्रसंगी दिली.
सुट्या भागांचे थेट प्रदर्शन आणि तांत्रिक मार्गदर्शन
या दोन दिवसीय उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, एचएएलला लागणाऱ्या विविध सुट्या भागांचे थेट प्रदर्शन 'निमा' हाऊसमध्ये भरवण्यात आले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे (Presentation) विमान निर्मितीसाठी आवश्यक असलेले घटक, उपघटक, मशिनिंग, फॅब्रिकेशन, टूलिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पोझिट्स उत्पादनांची तांत्रिक माहिती उद्योजकांना दिली. तसेच, एचएएलमध्ये व्हेंडर म्हणून नोंदणी कशी करावी, त्यांचे गुणवत्ता निकष, आवश्यक प्रमाणपत्रे आणि तांत्रिक अपेक्षा काय आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
उद्योजक आणि अधिकाऱ्यांमध्ये थेट संवाद
या कार्यशाळेत उद्योजकांनी एचएएलच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. अनेक स्थानिक अभियांत्रिकी उद्योग आणि स्टार्टअप्सनी एचएएलच्या पुरवठा साखळीत सहभागी होऊन नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची इच्छा व्यक्त केली.
रोजगार निर्मिती आणि औद्योगिक प्रगतीला चालना: आशिष नहार
"नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रात व्यवसायाच्या अथांग संधी आहेत. या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून एचएएलसारख्या देशातील अग्रगण्य संरक्षण संस्थेचे अधिकृत पुरवठादार बनू शकतील. परिणामी, या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि प्रदेशाच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळेल."
- आशिष नहार, अध्यक्ष, निमा.
दिग्गजांची उपस्थिती
संरक्षण उत्पादन क्षेत्रात नाशिकला एक महत्त्वाचे केंद्र (डिफेन्स हब) म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी निमा अध्यक्ष आशिष नहार यांच्यासह किशोर राठी, मनीष रावल, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, एमएसएमई कमिटीच्या चेअरमन दिपाली चांडक, मंगेश गांधी, प्रीतम बागुल, जयदीप राजपूत, अनिल मंत्री, सी. एस. सिंग, आशिष चांडक आणि एचएएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.