एस.के. खेडकर, (नाशिक) ११ जुलै - उत्तर महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आदेश (वेतन प्रणाली) घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील महत्त्वाचा संशयित आरोपी प्रशांत तुळशीराम वाडीले याला गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून बेड्या ठोकल्या आहेत. धुळे न्यायालयातून त्याचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला असून, त्याला उद्या (१२ जुलै) नाशिकरोड न्यायालयात हजर केले जाणार आहे.
८४१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या नावाने शासनाची फसवणूक
नाशिक विभाग उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमधील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रस्ताव नसताना हा घोटाळा करण्यात आला. संशयितांनी मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेश तयार केले. त्यानंतर शालार्थ प्रणालीत बनावट ड्राफ्ट भरून कोट्यवधी रुपयांचे वेतन आणि मागील थकबाकी (फरक) लाटून शासनाची १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल आहे.
बनावट स्वाक्षऱ्या अन् वाडीलेचे कनेक्शन
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित प्रशांत वाडीले (रा. धुळे) याने धुळे जिल्ह्यातील काही संस्थांच्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आदेश तयार करून दिले होते. या बनावट आदेशांवर तत्कालीन उपसंचालकांच्या स्वाक्षऱ्या मिळवून, संबंधित कर्मचाऱ्यांना नियमित वेतन आणि मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम अदा करण्यात त्याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
१२०० संशयित रडारवर!
या महाघोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असून, पोलिसांच्या तपासात आतापर्यंत संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आणि दलाल अशा तब्बल १२०० आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळजनक वातावरण आहे.
अशी झाली अटक
नाशिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शाखा पथक अंबड युनिट-३ चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अंमलदार कराड, गिते, येवले, बोडके, पचलोरे आणि महाले यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे धुळे येथे सापळा रचून प्रशांत वाडीलेला अटक केली.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
सदर कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके, वपोनि रामदास शेळके, सपोनि उमेश बोरसे, पोउनि किरण शेवाळे, राजेंद्र गिते, शिवाजी कुलकर्णी, संदीप बागल यांच्या पथकाने केली असून घोटाळ्याचा पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.