९० हजार घेताना लाचखोर हवालदार जाळ्यात... ब्लॅकमेल करून आधीच उकळले होते ६० हजार...

Share:
Main Image
Last updated: 11-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ११ जुलै - पोल्ट्री आणि चिकन विक्री व्यवसायाच्या आड गुजरात राज्यातून गुटख्याची तस्करी करण्यास मुभा देण्याच्या मोबदल्यात चक्क एक लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती ९० हजार रुपयांची रोकड स्वीकारणाऱ्या पेठ पोलीस ठाण्याच्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. मनोज दत्तू गायकवाड (वय ३७) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी ६० हजार उकळले, तरीही भूक भागेना!

तक्रारदार तरुण हा मूळचा पेठ येथील रहिवासी असून, तो गुजरात राज्यातील सुतारपाडा येथे चिकन विक्रीचा व्यवसाय करतो. नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांकडून कोंबड्या खरेदी करून तो तिथे नेतो. गेल्या महिन्यात संशयित हवालदार मनोज गायकवाड याने वांगणी भागात तक्रारदाराची स्विफ्ट कार अडवून झडती घेतली होती. "तू चिकन व्यवसायाच्या नावाखाली बंदी असलेला गुटखा राज्यात आणतोस का?" अशी विचारणा करत त्याने व्यावसायिकाला गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. "तुमच्या कुटुंबीयांचे पेठ तालुक्यात चांगले नाव आहे, गुन्हा दाखल झाल्यास इज्जत जाईल," अशी भीती दाखवून गायकवाड याने आधीच ६० हजार रुपये उकळले होते.

एसीबीच्या पडताळणीत लाच उघड

Advertisement

काही दिवस उलटत नाही तोच संशयित हवालदाराने गेल्या रविवारी (५ जुलै) पुन्हा या व्यावसायिकाशी संपर्क साधला. बेकायदा गुटखा आणि कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या सुरळीत सुरू ठेवण्यासाठी त्याने तोंडवळ फाटा येथे बोलावून आणखी पैशांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने नाशिक एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणीत गायकवाड याने १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

हॉटेल राऊ परिसरात थरार; रंगेहात अटक

लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी गायकवाड याने तक्रारदाराला नाशिक शहरातील राऊ हॉटेल भागात बोलावले होते. त्यानुसार एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (१० जुलै) या परिसरात सापळा रचला. आमदार गुळाचा चहा दुकान परिसरात संशयित मनोज गायकवाड याने तक्रारदाराकडून ९० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले.

एसीबीचे पथक

ही यशस्वी कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर अधीक्षक प्रदीप मैसळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार प्रमोद चव्हाणके, अंमलदार संजय ठाकरे आणि योगेश शिंदे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.