मुंबई, (प्रतिनिधी) ११ जुलै - जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे सुरू असलेल्या एका कथित बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या कारखान्याचा अन्न परवाना तातडीने निलंबित करून आस्थापना सील करण्यात आली असून, प्रयोगशाळेचा अहवाल येताच संबंधित मालकाचा परवाना कायमचा रद्द केला जाईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. सभागृहात सदस्य प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी ही माहिती दिली.
तुपामध्ये खाद्यतेल आणि 'इसेन्स'ची भेसळ
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तीर्थपुरी येथील मे. मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेवर छापा टाकला होता. या तपासणी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली. तिथे अस्सल तुपामध्ये खाद्यतेल आणि तुपाचा सुवास (फ्लेवर) देणारे केमिकल्स/इसेन्स मिसळून बनावट तूप तयार केले जात असल्याचे रंगेहात आढळून आले.
१३.०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
या धडक कारवाई दरम्यान पथकाने मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त साठा जप्त केला आहे:
पॅकबंद तूप: १,१२१.८ लिटर
खुल्या स्वरूपातील तूप: ६६३.८ लिटर
रिफाइंड सोयाबीन तेल: ११८ लिटर
एकूण किंमत: सुमारे १३ लाख ४ हजार रुपये
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कठोर कारवाई
कारवाई दरम्यान पथकाने एकूण आठ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले आहेत. हे सर्व नमुने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल सध्या प्रलंबित आहे. हा अहवाल प्राप्त होताच 'अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६' नुसार संबंधितांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.