पोलिसांना गुंगारा देणारी 'ती' दुकली अखेर जेरबंद... मोतीवाला कॉलेज परिसरात यशस्वी सापळा...

Share:
Main Image
Last updated: 11-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ जुलै - फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन पसार झालेल्या दोन अट्टल ठकबाजांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने ध्रुवनगर परिसरातील मोतीवाला कॉलेजजवळ ही धडक कामगिरी केली. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Advertisement

'हे' आहेत अटक केलेले संशयित
आनंद बद्रीनाथ भट्ट (वय ६०, रा. मनमोहन सोसायटी, राज्य कर्मचारी वसाहत, मॉडर्न शाळेच्या मागे, अशोकनगर) आणि राजेश कैलास विश्वकर्मा (वय ३८, रा. समतानगर, सातपूर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत.

गुन्हा दाखल होताच झाले होते पसार
संशयित आनंद भट्ट आणि राजेश विश्वकर्मा यांच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची पोलिसांत नोंद होताच अटकेच्या भीतीने दोघेही संशयित फरार झाले होते. सातपूर पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. मात्र, हे संशयित पोलिसांना हुलकावणी देत सातत्याने आपली ठिकाणे बदलत होते.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

दोघेही संशयित ध्रुवनगर भागातील मोतीवाला कॉलेज परिसरामध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने परिसरात तात्काळ सापळा रचला आणि संशयित येताच अत्यंत शिताफीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

यांनी केली कारवाई:

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, जमादार मनोहर शिंदे, हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रविण वानखेडे आणि तेजस मते यांच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.