चोरीची दुचाकी विकायला आला... इदगाह मैदानावर असा रचला सापळा...

Share:
Main Image
Last updated: 10-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जुलै - पंचवटी परिसरातून चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत चोरट्याला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (युनिट ३) ईदगाह मैदानावर सापळा रचून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल जप्त केली असून, संशयिताला पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

निळ्या रंगाच्या रेनकोटमुळे लागला सुगावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शंकर लहानगे (वय ३३, मूळ रा. फुलेनगर, पेठ रोड, सध्या रा. पिंपळद, ता. जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चोराचे नाव आहे.

ईदगाह मैदानावर निळ्या रंगाचा रेनकोट परिधान केलेला एक इसम चोरीची मोटारसायकल अत्यंत स्वस्त दरात विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती अंबड युनिट ३ च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (७ जुलै) ईदगाह मैदान परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. माहितीमध्ये मिळालेल्या वर्णनाचा संशयित दुचाकीसह येताच पोलिसांनी झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

पंचवटीतून केली होती दुचाकीची चोरी

पोलिसांनी संशयित गणेश लहानगे याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने ही 'होंडा ड्रीम युगा' मोटारसायकल पंचवटी परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी जप्त करून संशयिताला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

'या' वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही यशस्वी कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, अंमलदार भगवान जाधव, चारूदत्त निकम, कुणाल पचलोरे, राजेश महाले आणि महिला अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Advertisement

Comments

No comments yet.