मायलेकासह सुनेस लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण... १० जणांवर गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 09-Jul-2026

निफाड, (प्रतिनिधी) ९ जुलै - शेतीच्या वादातून एका दांपत्यासह महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे घडली आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात तीन महिलांसह एकूण दहा जणांविरोधात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक्रमण विचारल्याचा आला राग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव (ता. निफाड) येथील संगिता बाळू बर्डे (वय ४५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संगिता बर्डे या मंगळवारी (७ जुलै) आपला मुलगा खंडू आणि सुनेस सोबत घेऊन बोकडदरे शिवारातील गट नंबर ३-५ मधील आपल्या वाट्याची शेतजमीन कसण्यासाठी गेल्या होत्या. तेथे गेल्यानंतर त्यांना जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. याबाबत संगिता बर्डे आणि त्यांचा मुलगा खंडू यांनी संशयितांना जाब विचारला. याचा राग आल्याने संशयितांनी त्यांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हातातील लाठ्या-काठ्यांनी तिघांनाही बेदम मारहाण केली.

Advertisement

२९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला
मारहाण सुरू असतानाच संशयितांनी संगिता बर्डे यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र, मुलगा खंडू याच्या गळ्यातील चांदीची साखळी आणि एक मोबाईल फोन असा एकूण २९ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला आणि तिथून पोबारा केला.

नातेवाईकांवरच गुन्हा दाखल
विशेष म्हणजे फिर्यादी आणि संशयित हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. संगिता बर्डे यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलिसांनी भगवान बर्डे, ज्ञानेश्वर बर्डे, दगू बर्डे, दत्तू बर्डे, विशाल बर्डे, चेतन बर्डे, लहू बर्डे आणि अन्य तीन महिला (सर्व राहणार बोकडदरे, ता. निफाड) अशा १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.