दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ९ जुलै - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरक्षित, सुयोग्य आणि कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यात येत असून, दोन्ही संस्थांनी आगामी कृती आराखड्यावर सहमती दर्शविली आहे. या नियोजनाचा भाग म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ३ जुलै रोजी नवी दिल्ली येथील ‘NDMA’च्या मुख्यालयाला भेट दिली. तेथे प्राधिकरणाचे सदस्य व विभागप्रमुख डॉ. कृष्णा एस. वत्स आणि सल्लागार कर्नल कीर्ती प्रताप सिंह यांच्यासोबत सिंहस्थ २०२७ च्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
हायटेक यंत्रणा अन् हाय-रिस्क मॅनेजमेंटवर भर
बैठकीत सिंहस्थातील गर्दीचे व्यवस्थापन आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली:
'सीबीआरएनई' (CBRNE) सज्जता: रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गीय, अण्वस्त्र आणि स्फोटक स्वरूपाच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष तयारी केली जात आहे.
हॅझमॅट वाहने: धोकादायक रसायनांचा सामना करण्यासाठी (Hazmat) विशेष प्रतिसाद वाहने उपलब्ध करून दिली जातील.
एकात्मिक कमांड सेंटर: विविध आपत्कालीन कार्यान्वयन केंद्रांना (EOC) जोडणारे एक मध्यवर्ती आणि अत्याधुनिक 'एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर' उभारले जाणार आहे.
प्रयागराज, उज्जैनच्या अनुभवांचा फायदा घेणार
यापूर्वी प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यांमधील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्यांचा समावेश नाशिक सिंहस्थाच्या नियोजनात केला जाईल. कर्नल कीर्ती प्रताप सिंह यांनी यापूर्वीच्या कुंभमेळ्यांतील अनुभवांचे दस्तावेजीकरण करून जोखीमाधारित नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तर, मोठ्या धार्मिक मेळाव्यांसाठी आदर्श ठरेल असे आपत्ती जोखीम व्यवस्थापनाचे मॉडेल विकसित करण्याची गरज डॉ. वत्स यांनी व्यक्त केली.
केंद्रीय पथक नाशिकमध्ये येणार; सप्टेंबरमध्ये परिषद
पुढील टप्प्यात १५ जुलैनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी नाशिकचा दौरा करणार असून प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी आणि विविध विभागांच्या सज्जतेचा आढावा घेणार आहेत.
त्यानंतर, सप्टेंबरच्या सुरुवातीला नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने दोन दिवसीय 'अनुभव आदान-प्रदान परिषद' आयोजित केली जाईल. यामध्ये पूर्वीच्या कुंभमेळ्यांचे आयोजन केलेले अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होऊन सिंहस्थाची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करतील.