मालेगाव, (प्रतिनिधी) ९ जुलै - शेत सुपीक करण्यासाठी तलावातून गाळ काढण्याच्या कामात वापरलेल्या वाहनांचे इंधनाचे बिल शासनाकडून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मालेगाव येथील जलसंधारण उपविभागाच्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. श्रीकांत काशिनाथ पाटील (वय ३८, रा. देवपूर, धुळे) असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी मालेगाव येथील कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गाळ काढण्याच्या परवानगीचा होता व्यवहार
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मित्राने नांदगाव तालुक्यातील घोरपडी पाझर तलावातून शेत सुपीक करण्यासाठी गाळ काढण्याकरिता उपविभागीय जलसंधारण, मृद व जलसंधारण उपविभाग, मालेगाव येथे अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना परवानगीही मिळाली होती.
या गाळ काढण्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांच्या इंधनाचे बिल शासनाकडून मंजूर करून देण्याच्या बदल्यात कनिष्ठ लिपीक श्रीकांत पाटील याने ५,४०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी ५,००० रुपयांवर तडजोड झाली.
कार्यालयातच रचला सापळा
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने बुधवारी (८ जुलै) मालेगाव येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून ठरलेली ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना श्रीकांत पाटील याला पंचांसमक्ष रंगेहात अटक करण्यात आली.
'या' पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांनी काम पाहिले, तर त्यांच्यासोबत पोलीस हवादार प्रफुल्ल माळी, विलास निकम आणि समीर शेख यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क साधावा.
टोल फ्री क्रमांक: १०६४
व्हॉट्सॲप क्रमांक: ९९३०९९७७००
वेबसाईट: acbmaharashtra.gov.in